पाचोरा (प्रतिनिधी शेख जावीद) | जळगाव जिल्ह्यातील नागरिकांच्या विविध तक्रारी, समस्या आणि प्रलंबित प्रशासकीय बाबींचे स्थानिक स्तरावरच जलद, प्रभावी व पारदर्शक पद्धतीने निवारण व्हावे, यासाठी जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे यांच्या संकल्पनेतून ‘जनसमाधान बैठक’ हा एक अत्यंत अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत आता दर गुरुवारी जिल्ह्यातील विविध उपविभागीय अधिकारी (SDO) कार्यालयांमध्ये चक्राकार (रोटेशन) पद्धतीने जनसमाधान बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे.
विशेष बाब म्हणजे, स्वतः जिल्हाधिकारी संबंधित उपविभागीय कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या ऐकून घेणार आहेत आणि संबंधित विभागांमार्फत त्यावर तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश देणार आहेत. नागरिकांना आपल्या तक्रारींसाठी जिल्हा मुख्यालयी (जळगाव येथे) येण्याची आवश्यकता भासू नये, प्रशासन स्वतः नागरिकांच्या दारात पोहोचावे आणि स्थानिक स्तरावरच प्रश्नांचे निराकरण व्हावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या उपक्रमात पारदर्शकता आणण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात आला आहे. ‘जनसमाधान पोर्टल’ आणि ‘QR Code’ आधारित प्रणालीच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या प्रत्येक अर्जाची डिजिटल नोंद केली जाणार आहे. प्रत्येक अर्जाला एक स्वतंत्र QR Code दिला जाईल. नागरिकांना त्यांच्या अर्जाची सद्यस्थिती (Status) मोबाईलद्वारे ऑनलाइन घरबसल्या पाहता येईल. संबंधित शासकीय कार्यालयांना प्रलंबित प्रकरणांबाबत स्वयंचलित स्मरणपत्रे (Automated Reminders) पाठविली जातील. प्रत्येक तक्रारीवरील कार्यवाहीची अद्ययावत माहिती पोर्टलवर उपलब्ध राहील. या प्रणालीमुळे तक्रार निवारण प्रक्रियेत पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि कमालीची गती निर्माण होण्यास मदत होणार आहे.
जनसमाधान बैठकीचे नियम निश्चित करण्यात आले असून, खालील प्रकारच्या तक्रारी किंवा अर्ज या बैठकीत स्वीकारले जाणार नाहीत: १. माहितीचा अधिकार (RTI) अंतर्गत असणारे अर्ज. २. अधिकृत ‘लोकशाही दिना’शी संबंधित असणारे अर्ज. ३. जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे सादर करावयाच्या तक्रारी. ४. न्यायालयीन किंवा न्यायप्रविष्ट (Sub-Judice) असणारी प्रकरणे. ५. शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदली, सेवाविषयक किंवा त्यांच्या वैयक्तिक मागण्यांचे अर्ज.
या अभिनव उपक्रमांतर्गत आज, दिनांक ११ जून २०२६ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी १.०० वाजण्याच्या दरम्यान माननीय जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे हे पाचोरा प्रांत कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. पाचोरा उपविभागातील (पाचोरा आणि भडगाव तालुका) नागरिकांनी आपल्या समस्या व तक्रारींबाबत या बैठकीस उपस्थित राहावे; जिल्हाधिकारी महोदय स्वतः नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या प्रश्नांचे जागेवरच निवारण करणार आहेत, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.







