जळगाव (प्रतिनिधी तेजस भंगाळे) | जळगाव जिल्ह्यात अवैध व्यवसायांविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पथकाने एक मोठी आणि यशस्वी कारवाई केली आहे. महाराष्ट्र राज्यात विक्री, वाहतूक व साठवणुकीस प्रतिबंधित असलेला तब्बल २१ लाख ६१ हजार ६०० रुपयांचा सुगंधित गुटखा आणि ७ लाख रुपयांचे मालवाहू वाहन, असा एकूण २८,६१,६००/- रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुषंगाने, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना ९ जून २०२६ रोजी एका गोपनीय बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, जळगाव शहरातून महामार्गावरून प्रतिबंधित गुटख्याची मोठी वाहतूक होणार आहे. या माहितीच्या आधारे एमआयडीसी पोलिसांचे एक विशेष पथक तात्काळ तयार करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, विशेष पथकाने अजिंठा चौक ते इच्छादेवी चौक दरम्यान असलेल्या डिझो पेट्रोलपंप परिसरात पाळत ठेवली. यादरम्यान संशयास्पद हालचाली दिसल्याने पोलिसांनी एक चारचाकी मालवाहू वाहन (महिंद्रा बोलेरो पिकअप क्र. MH-19-CX-3260) थांबवून त्याची कसून तपासणी केली. या तपासणीत वाहनामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या ‘विमल सुगंधित गुटखा व पानमसाला’च्या एकूण ५८ गोण्या आढळून आल्या. त्यांची किंमत २१ लाख ६१ हजार ६०० रुपये असून, त्यासोबत ७,००,०००/- रुपये किंमतीची महिंद्रा बोलेरो पिकअप (MH-19-CX-3260) असा एकूण २८ लाख ६१ हजार ६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ च्या विविध कलमांसह भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २७५, २७४ व २२३ अन्वये गुन्हा (रजि. क्र. १५७/२०२६) दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात वाहन चालक जोगेंद्र भिका पाटील (रा. फुलपाट, ता. धरणगाव, जि. जळगाव) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके करत आहेत.
ही धडक कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखालील पथकातील पोउपनिरी चंद्रकांत धनके, सफौ विजयसिंग पाटील, पोहेकॉ गिरीश पाटील आणि पोहेकॉ लाडवंजारी यांनी ही उत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध गुटखा तस्करांचे धाबे दणाणले आहेत.







