ठाणे गुन्हे शाखेकडून मुंब्र्यातील मोबाईल शॉपबाहेर झालेली ३.३१ लाखांची दरोड्याची घटना उघड; एकास अटक

ठाणे गुन्हे

मुंबई (उपसंपादक प्रकाश कदम) | मुंब्रा परिसरात एका व्यक्तीला चॉपरचा धाक दाखवून, मारहाण करत ३ लाख ३१ हजारांचा मुद्देमाल लुटणाऱ्या दरोड्यातील एका मुख्य आरोपीला अटक करण्यात ठाणे गुन्हे शाखा, घटक-१ च्या पथकाला यश आले आहे. शब्बीर कासम अली शेख (वय २१, रा. अमृतनगर, मुंब्रा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याचे इतर साथीदार अद्याप फरार आहेत.

 

मिळालेल्या माहितीनुसार, २८ जून २०२६ रोजी पहाटे ४:१८ ते ४:४० च्या सुमारास कौसा, मुंब्रा येथील शिमला पार्कजवळील ‘टारगेट मोबाईल शॉप’समोर ही घटना घडली होती. आरोपींनी आपसात कट रचून फिर्यादीला व्हॉट्सॲप आणि स्नॅपचॅटवर सतत फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर दामाजी बिल्डिंगसमोरील सार्वजनिक रस्त्यावर फिर्यादीला गाठून चॉपरचा धाक दाखवत मारहाण केली. आरोपींनी फिर्यादीचा ५,००० रुपयांचा मोबाईल आणि त्यांच्या गाडीची तोडफोड करून गाडीतील ३ लाख रुपयांची रोकड, असा एकूण ३ लाख ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरून नेला होता.

याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच शस्त्र कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हा रजि. नंबर ११२२/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समांतर तपास करून आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तपास सुरू असताना गुन्हे शाखा घटक-१ चे पोलीस हवालदार धनंजय आहेर यांना गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने मुंब्र्यातील ठाकुरपाडा परिसरात सापळा रचला आणि ४ जुलै २०२६ रोजी आरोपी शब्बीर कासम अली शेख याला ताब्यात घेऊन अटक केली. पोलीस आता त्याच्या इतर फरार साथीदारांचा शोध घेत आहेत.

सदरची यशस्वी कामगिरी पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री. अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त (शोध-१) श्री. शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सचिन गायकवाड, पोलीस उप-निरीक्षक प्रकाश शिरसाठ, श्रेणी पोलीस उप-निरीक्षक दीपक जाधव, पोलीस हवालदार संदीप महाडिक, शब्बीर फरास, धनंजय आहेर, मुकुंद आव्हाड, महिला पोलीस हवालदार दिपाली जाधव, चालक पोलीस हवालदार शशिकांत सावंत, पोलीस शिपाई अमोल ढावरे, प्रशांत लवटे आणि सागर सुरळकर यांच्या पथकाने केली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here