नाशिक (उपसंपादक इंजि.कुबेर जाधव) | चार तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना (वसाका) परिसरात सध्या भुरट्या व सराईत चोरांनी उच्छाद मांडला आहे. कारखाना परिसरातील इलेक्ट्रॉनिक मोटारी, वेल्डिंग मशिन आणि विद्युत मोटारी फोडून त्यातील शेकडो किलो तांब्याची वायर चोरून नेण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.
काही दिवसांपूर्वीच चोरट्यांनी १७ केव्हीए क्षमतेचे महाकाय जनित्र (जनरेटर) खोलून, त्याला होज पाईप लावून हजारो लीटर महागडे ऑइल चोरून नेले होते. चोरटे कारखान्याच्या पाठीमागील भिंतींना भगदाड पाडून सातत्याने चोऱ्या करत आहेत. आतापर्यंत बिबट्याच्या भीतीने या भागात चोऱ्या कमी होत होत्या, मात्र आता बिबट्यांच्या भरवशावर कारखान्याची सुरक्षा ठेवणे जिकिरीचे झाले आहे.
काल रात्री अशाच प्रकारे स्थानिक भामट्यांनी कारखान्यात चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुख्य प्रवेशद्वारावरील सुरक्षा रक्षक आणि स्थानिक गावकऱ्यांनी प्रसंगावधान राखत आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या मदतीने तीन पैकी एका चोरट्याला शिताफीने पकडले. उर्वरित दोन चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. पकडलेल्या चोरट्याला तातडीने पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. सध्या देवळा पोलीस ठाण्याचे अधिकारी सार्थक नेहते यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.
कारखान्यात सातत्याने होणाऱ्या या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर ‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे’ समन्वयक कुबेर यांनी प्रत्यक्ष कारखान्याच्या गेटवर जाऊन परिस्थितीची पाहणी केली. पोलीस प्रशासनाने या भागात गस्त वाढवून चोरांवर कडक कारवाई करावी आणि कारखाना प्रशासनाने सुरक्षेत वाढ करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.









