खुलताबाद तालुक्यात मळणी यंत्रात अडकून ३० वर्षीय महिला मजुराचा जागीच मृत्यू

खुलताबाद

खुलताबाद (जिल्हा क्राइम रिपोर्टर मुनीर शहा) | तालुक्यातील बाजार सावंगी परिसरातील इंदापूर येथे मळणी यंत्रात (थ्रेशर) अडकून एका ३० वर्षीय महिला मजुराचा जागीच मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. संगीताबाई तेडसिंग ताडिया (वय ३०, मूळ रा. पाजरे, ता. शेंदवा, जि. बडवाणी, मध्य प्रदेश; हल्ली मुक्काम पाडळी) असे मयत महिलेचे नाव आहे. या घटनेनंतर संबंधित मळणी यंत्र पोलिसांनी जप्त करून बाजार सावंगी पोलीस चौकीत जमा केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाडळी येथील अन्सार हसन शेख यांच्या मालकीचे मळणी यंत्र घेऊन मध्य प्रदेशातील काही मजूर इंदापूर शिवारातील बाळू बाहदुरे यांच्या गट नंबर ४६ मधील शेतात कांदा बीज काढण्याचे काम करत होते. या कामासाठी विक्रम सेनानी, नानीबाई विक्रम आणि संगीताबाई ताडिया हे मजूर आले होते.
दुपारी चार वाजेच्या सुमारात सर्व मजूर टोपल्याने कांदा बीज थ्रेशर मशीनमध्ये टाकत होते. याच दरम्यान अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे संगीताबाई यांचा तोल जाऊन त्या मळणी यंत्राच्या फिरत्या पट्ट्याकडे (बेल्ट) झोकल्या गेल्या. क्षणात त्या मशीनच्या रोटरमध्ये पूर्णपणे अडकल्या.
हा अपघात इतका भीषण होता की, मळणी यंत्राच्या रोटरमध्ये अडकल्यामुळे संगीताबाई यांच्या पाठीला, कमरेला आणि पायाला गंभीर स्वरूपाचा मार लागला. यात प्रचंड रक्तस्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
या घटनेची माहिती इंदापूरचे पोलीस पाटील राम भगवान शिंदे यांनी तात्काळ बाजार सावंगी पोलीस चौकीला दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. बाजार सावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम शिंदे यांनी मयत संगीताबाई यांच्या मृतदेहाची उत्तरस्तरीय (Post-Mortem) तपासणी केली.पोलीस पाटील यांनी दिलेल्या जबाबावरून बाजार सावंगी पोलीस चौकीत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस अंमलदार नवनाथ कोल्हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here