खुलताबाद (जिल्हा क्राइम रिपोर्टर मुनीर शहा) | ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आणि विशेषतः सैनिक व पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुण-तरुणींना अचूक व योग्य मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने ‘संस्कार विद्या मंदिर इंग्लिश स्कूल’ व ‘जोया इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल’ (झरी) च्या भव्य प्रांगणात ‘फिनिक्स करिअर अकॅडमी’ची स्थापना करण्यात आली आहे. या अकॅडमीचा उद्घाटन सोहळा नुकताच मोठ्या दिमाखात आणि उत्साहात पार पडला.
अकॅडमीच्या नूतन नामफलकाचे अनावरण जिल्हा परिषद सदस्या श्रीमती प्रतीक्षा विकास कापसे, श्री. विकास कापसे आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्री. एल. जी. गायकवाड यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित सर्व मान्यवरांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून बाजार सावंगी पोलीस चौकीचे जमादार श्री. नवनाथ कोल्हे, पीएसआय श्री. कदीर पटेल, जिल्हा परिषद सदस्य श्री. कल्याण पाटील चव्हाण, ज्ञानेश्वर नलावडे, पुंजाराम पाटील नलावडे, पत्रकार मुनीर शाह, पत्रकार चांद खान पठाण आणि श्री. आनंदा काटकर उपस्थित होते. याशिवाय बंडू शिंदे, गणेश राऊत, विठ्ठल साळुंके, मुक्तार शेख, करण चंदवाडे, झाकीर शहा, सलीम पटेल, काकासाहेब लोंढे, साहेबराव लोंढे, रमजान शहा, रईस पटेल, सत्तार पटेल, गोरख राऊत, गणेश झोरावत, विजय चंद्राकडे यांसह परिसरातील अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. रायभान पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन श्री. नामदेव नलावडे यांनी उत्तमरीत्या सांभाळले. याप्रसंगी अकॅडमीचे संचालक डॉ. झाकीर शेख आणि इतर मान्यवरांनी उपस्थितांना संबोधित केले. “आजच्या स्पर्धात्मक युगात ग्रामीण भागातील तरुणांना योग्य वेळी अचूक मार्गदर्शन मिळणे ही काळाची गरज आहे, फिनिक्स अकॅडमी हाच विश्वास पूर्ण करेल,” असे विचार डॉ. शेख यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या शेवटी श्री. अरुण अघाडे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. परिसरातील जास्तीत जास्त तरुण-तरुणींनी या सुवर्णसंधीचा लाभ घेत अकॅडमीमध्ये आपली प्रवेश नोंदणी करावी, असे आवाहन संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.







