देवदत्त गोखले यांना पीएच.डी. प्रदान; छ. शिवाजी महाराजांच्या कार्यसंस्कृतीवर केले संशोधन

देवदत्त गोखले

जळगाव (संपादक सुनिल पाटील) । ‘गती’ संस्थेचे संचालक देवदत्त चारुदत्त गोखले यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे ‘कॉमर्स अँड मॅनेजमेंट’ विद्याशाखेअंतर्गत नुकतीच विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी प्रदान करण्यात आली. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) व्ही. एल. माहेश्वरी यांच्या हस्ते आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांनी या पदवीचे अधिकृत नोटिफिकेशन स्वीकारले.

 

देवदत्त गोखले यांनी छ. शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील किल्ल्यांद्वारे प्रकट होणारी समकालीन कार्यसंस्कृती आणि त्यांच्या वैशिष्ट्यांचा विश्लेषणात्मक अभ्यास या अत्यंत अभ्यासपूर्ण आणि नाविन्यपूर्ण विषयावर आपले संशोधन सादर केले. त्यांच्या या शोधप्रबंधासाठी त्यांना जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट येथील व्यवस्थापन विभागप्रमुख डॉ. विशाल सुनील राणा आणि संचालिका प्रा. (डॉ.) प्रीती अग्रवाल यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या संशोधनाचा उपयोग आगामी काळात कॉर्पोरेट जगतात, शैक्षणिक क्षेत्रात, सामाजिक स्तरावर आणि एकूणच लोककल्याणासाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

या यशाबद्दल भावना व्यक्त करताना देवदत्त गोखले म्हणाले की, “या संशोधनामुळे माझे आजोबा, खानदेशातील सुप्रसिद्ध व पहिले चार्टर्ड अकाउंटंट तसेच माजी आमदार प्रा. पी. डी. दलाल यांचे स्वप्न आज पूर्ण झाले असून, हा माझ्यासाठी सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे.” या संपूर्ण संशोधन प्रवासात विविध संस्था, प्राध्यापक आणि सहकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले. देवदत्त गोखले यांच्या या यशाबद्दल शैक्षणिक, व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here