निर्भया पथकाची धडक कारवाई; पंढरपुरात होणारा बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश

बालविवाह

पंढरपूर (रिपोर्टर प्रकाश इंगोले) | पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रशासनाच्या सतर्कतेमुळे एक मोठा अनर्थ टळला आहे. विवाहबंधनात अडकणार असलेली मुलगी अल्पवयीन असल्याचे समोर आल्यानंतर, निर्भया पथकाने तात्काळ हस्तक्षेप करत होऊ घातलेला बालविवाह रोखला. पोलिसांच्या या तत्परतेमुळे एका अल्पवयीन मुलीचे जीवन खुलण्याआधीच उद्ध्वस्त होण्यापासून वाचले असून, तिला एक प्रकारे नवीन जीवनदान मिळाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर ग्रामीण हद्दीत दिनांक २ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास एक बालविवाह होणार असल्याची गोपनीय माहिती निर्भया पथकाला मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी नवरदेवाच्या मोबाईल लोकेशनचा माग काढण्यास सुरुवात केली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत पोलिसांनी नवरदेवाचे अचूक लोकेशन शोधून काढले आणि विवाहाच्या ठिकाणी वेळेत पोहोचून लग्न सोहळा थांबवला.

विवाहस्थळी पोहोचल्यानंतर निर्भया पथकाने मुलीच्या वयाबाबत सखोल चौकशी सुरू केली. सुरुवातीला मुलीच्या नातेवाईकांनी तिचे ओळखपत्र दाखवले, ज्यामध्ये मुलीचे वय १७ वर्षे ५ महिने असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, पोलिसांना संशय आल्याने त्यांनी अधिक तपास करत मुलीचा शाळा सोडल्याचा दाखला (एल.सी.) मिळवला. त्यावरही तिचे वय १७ वर्षे ५ महिने असल्याचेच स्पष्ट झाले. मुलगी पूर्णपणे अल्पवयीन असल्याचे सिद्ध झाल्यानंतर, पोलिसांनी मंडपातील वऱ्हाडी मंडळींना आणि मुलीच्या वडिलांना बालविवाह कायद्याची माहिती देऊन योग्य ती समज दिली व हा विवाह अधिकृतपणे रोखला. पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी त्या अल्पवयीन मुलीस बालकल्याण समिती, सोलापूर यांच्यासमोर हजर करण्यात आले आहे.

या यशस्वी कारवाईनंतर निर्भया पथक, पंढरपूर विभाग यांनी पंढरपूर शहर, पंढरपूर तालुका, ग्रामीण तसेच करकंब पोलीस ठाणे हद्दीतील सर्व नागरिकांना जाहीर आवाहन केले आहे:”अल्पवयीन मुलींचे वय खेळण्या-बागडण्याचे आणि शिकण्याचे असते. त्यांचे जीवन खुलण्याआधीच त्यांच्यावर संसाराच्या जबाबदारीचे ओझे टाकणे बंद करा. आपल्या परिसरात किंवा नातेवाईकांमध्ये असा कोणताही बालविवाह होत असल्याचे आढळल्यास, नागरिकांनी तात्काळ निर्भया पथकाशी संपर्क साधावा.”

सदरची कौतुकास्पद कारवाई सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि पंढरपूर विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या कारवाईत निर्भया पथक प्रमुख महिला पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया यादव/रावण, महिला पोलीस कॉन्स्टेबल (म.पोकॉ/१३११) निर्मला वाघमारे, म.पोकॉ/२०४८ शाहिन, पोलीस कॉन्स्टेबल (पोकॉ/१२३६) शशिकांत सावंत, पोकॉ/१३९५ लक्ष्मण कुचेकर, चालक पोलीस कॉन्स्टेबल (चापोकॉ/७२) पांडुरंग टिंगरे आणि काझी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here