काहुरखेडे येथील जिल्हा परिषद शिक्षक समाधान जाधव यांना राज्यस्तरीय ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रदान

शिक्षक समाधान जाधव

जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर शरद चव्हाण) | शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय आणि मार्गदर्शक कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करणाऱ्या रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन, दापोली यांच्या वतीने देण्यात येणारा ‘महाराष्ट्र राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५-२६’ जाहीर झाला आहे. हा अत्यंत मानाचा पुरस्कार जळगाव जिल्ह्यातून एकमेव प्राथमिक शिक्षक म्हणून समाधान रामचंद्र जाधव यांना प्रदान करण्यात आला. समाधान जाधव हे भुसावळ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, काहुरखेडे येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशनच्या कडक नियमावली आणि अत्यंत पारदर्शक निवड प्रक्रियेनुसार या पुरस्कारासाठी निवड केली जाते. राज्यभरातील शिक्षकांनी केलेले शैक्षणिक, सामाजिक तसेच विद्यार्थीकेंद्रित कार्य याचा सखोल आढावा निवड समितीने घेतला होता. या संपूर्ण प्रक्रियेत समाधान जाधव यांनी आपल्या कार्याने ठसा उमटवत जळगाव जिल्ह्यातून एकमेव पुरस्कारार्थी होण्याचा मान मिळवला.

हा मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार माननीय पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांच्या शुभहस्ते समाधान जाधव यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. या शानदार सोहळ्याप्रसंगी रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय काशीद, महाराष्ट्र राज्य सल्लागार प्रदीप सोनवणे, जळगाव जिल्हाध्यक्ष गोविंद चौधरी यांच्यासह संस्थेचे इतर वरिष्ठ पदाधिकारी आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समाधान जाधव यांनी शिक्षण क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने राबविलेले विविध उपक्रम, वर्गातील नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती  आणि सामाजिक बांधिलकी जपत केलेले कार्य, या सर्व बाबींची दखल घेऊनच त्यांना या राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

शिक्षक समाधान जाधव यांना मिळालेल्या या बहुमानामुळे काहुरखेडे गाव, भुसावळ तालुका आणि संपूर्ण जळगाव जिल्ह्याच्या शैक्षणिक वैभवात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या या यशाबद्दल आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल जिल्हा परिषद प्रशासनासह विविध सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here