करवीर (विशेष प्रतिनिधी रामचंद्र रोटे) | रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध ‘आरे-वारे’ समुद्रकिनाऱ्यावर सहलीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांवर काळाने घाला घातला आहे. समुद्रात आंघोळीसाठी उतरलेल्या विद्यार्थ्यांपैकी एका १७ वर्षीय विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. अतुल रघुनाथ सुतार (वय १७, रा. सावर्डे दुमाला) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. दरम्यान, या घटनेत मयूर विष्णू खाडे (वय १६) हा विद्यार्थी देखील बुडत असताना, स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे त्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे सावर्डे दुमाला गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सावर्डे दुमाला, सडोली दुमाला आणि हिरवडे दुमाला या गावांमधील नुकतीच दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले तब्बल ४१ विद्यार्थी एका खाजगी शिकवणी वर्गामार्फत (प्रायव्हेट कोचिंग क्लास) रत्नागिरी येथे सहलीसाठी गेले होते. या सहलीमध्ये १७ ते १९ विद्यार्थिनींचाही समावेश होता. दुपारी सर्व विद्यार्थी आरे-वारे बीचवर फिरत असताना, काही जण आंघोळीसाठी समुद्राच्या पाण्यात उतरले. याच दरम्यान पाण्याचा अंदाज न आल्याने अतुल आणि मयूर हे दोघे जण पाण्यात वाहून जाऊ लागले.
दोघे जण पाण्यात बुडत असल्याचे लक्षात येताच एकच खळबळ उडाली. स्थानिक ग्रामस्थ आणि जीवरक्षकांनी तातडीने धाव घेत मयूर खाडे याला सुखरूप बाहेर काढले. मात्र, दुर्दैवाने अतुल सुतार याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
या दुर्घटनेची वार्ता सावर्डे दुमाला गावात पोहोचताच सर्वत्र भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले. सहलीला गेलेल्या उर्वरित विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांनी आपापल्या मुलांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी तातडीने फोन करून विचारपूस सुरू केली. या धक्कादायक प्रसंगामुळे सहलीतील इतर विद्यार्थीही प्रचंड भीतीच्या छायेत होते. घटनेची माहिती मिळताच मृत अतुलच्या नातेवाईकांनी तातडीने रत्नागिरीकडे धाव घेतली.
मयत अतुल हा अत्यंत गरीब कुटुंबातील आणि अभ्यासात होतकरू मुलगा होता. त्याचे वडील सुतारकाम करून अत्यंत कष्टाने कुटुंबाचा गाडा चालवतात. अतुलच्या अकाली जाण्याने सुतार कुटुंबाचा मोठा आधार हिरावला असून, त्याच्या पश्चात आई-वडील, लहान बहीण, आजोबा, चुलता आणि चुलती असा मोठा परिवार आहे. एका उमद्या आणि लाडक्या विद्यार्थ्याचा असा अचानक अंत झाल्याने संपूर्ण सावर्डे दुमाला गावावर दुःखाचे सावट पसरले असून, सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे.







