‘एक लाखाचे तीन लाख’ करून देण्याचे आमिष; इन्स्टाग्राम रिल्सद्वारे शिक्षकाला लुटणाऱ्या टोळीचा धुळे पोलिसांनी केला पर्दाफाश

एक लाखाचे तीन लाख

शिरपूर (महाराष्ट्र राज्य क्राइम रिपोर्ट्स पवन मराठे) | “एक लाख रुपयांचे तीन लाख रुपये करून देतो” असे आमिष दाखवून मध्यप्रदेशातील एका शिक्षकाला साक्री तालुक्यातील खोरी शिवारात बोलावून मारहाण करत लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा धुळे स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या ८ तासांत ३ मुख्य आरोपी निष्पन्न करून एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली.

 

पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्री. अनिल उमरावसिंह बोडाणा (वय ३५, रा. रुपाखेडी, ता. तराणा, जि. उज्जैन, मध्यप्रदेश) हे व्यवसायाने शिक्षक आहेत. संशयित आरोपी बाळूशेठ उर्फ राकेश सजनसिंग भोसले (रा. जामदे, ता. साक्री) याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर “एक लाखाचे तीन लाख रुपये बदलून मिळतील” अशा स्वरूपाचे रिल्स अपलोड केले होते. हे रिल्स पाहून शिक्षक अनिल बोडाणा हे आमिषाला बळी पडले आणि त्यांनी आरोपींशी संपर्क साधला.

आरोपींनी बोडाणा यांना पैशांच्या व्यवहारासाठी धुळे जिल्ह्यातील निजामपूर (ता. साक्री) येथे बोलावून घेतले. त्यानुसार बोडाणा हे आपल्या मित्रासह ३० मे २०२६ रोजी निजामपूर येथे आले. तेथून आरोपींनी त्यांना एका प्रवासी वाहनात बसवून खोरी गावाच्या शिवारात असलेल्या पवनचक्कीच्या टॉवरजवळ नेले.

त्या ठिकाणी आधीच ६ मोटारसायकलींवरून आलेले १२ ते १४ अज्ञात इसम दबा धरून बसले होते. त्यांनी शिक्षक व त्यांच्या मित्राला अडवून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आणि त्यांचे मोबाईल हिसकावून घेतले. त्यानंतर गळ्याला चाकू लावून जीवे मारण्याची धमकी देत, बळजबरीने ‘फोन-पे’ (PhonePe) द्वारे ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करून घेतले. तसेच त्यांच्याकडील रोख रक्कम, चांदीची चैन आणि चार्जर असा एकूण १,१४,२०0/- रुपये किमतीचा मुद्देमाल हिसकावून दरोडेखोर पसार झाले. याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १८५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३१०(२), ३११, ३१२ अन्वये दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि.) नामदेव सहारे व अंमलदारांचे विशेष पथक तयार करून आरोपींच्या शोधासाठी रवाना केले. पथकाने अवघ्या ८ तासांत तांत्रिक धागेदोरे शोधून काढत आरोपी मंगेश भैय्या कढरे (वय २५, रा. भामेर, ता. साक्री) याला भामेर येथून ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची सखोल चौकशीत कबुली दिली.

तपासात धक्कादायक माहिती समोर आली की, चाकूचा धाक दाखवून मुख्य आरोपी बाळूशेठ उर्फ राकेश भोसले याने फिर्यादीच्या मोबाईलवरून मंगेश कढरे याच्या फोन-पे क्रमांकावर ३५,०००/- आणि ७१,०००/- असे दोन वेळा मिळून एकूण १,०६,०००/- रुपये ट्रान्सफर केले होते. ही रक्कम बाळूशेठने तातडीने वेगवेगळ्या मार्गाने काढून घेतली. यात ४०,०००/- रुपये एटीएमद्वारे काढले, तर उर्वरित ६५,०००/- रुपये निजामपूर येथील पेट्रोल पंपावर कामाला असलेल्या मुकेश प्रकाश भामरे (सह-आरोपी, रा. भामेर) याच्या मोबाईलवर पाठवून ते खोरी गावाजवळ रोखीने हस्तगत केले होते.

पोलीस पथकाने तात्काळ कारवाई करत मुख्य आरोपी मंगेश भैय्या कढरे याला अटक करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी निजामपूर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या गुन्ह्यात सामील असलेला बाळूशेठ उर्फ राकेश भोसले, मुकेश भामरे आणि जामदे परिसरातील इतर १२ ते १३ आरोपींचा पोलीस कसून शोध घेत आहेत.

सदर कौतुकास्पद कामगिरी पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, सपोनि. नामदेव सहारे, पोलीस अंमलदार सदेसिंग चव्हाण, पंकज खैरमोडे, तुषार सूर्यवंशी, महेंद्र सपकाळ, अतुल निकम, योगेश जगताप आणि संजय सुरसे यांच्या पथकाने पार पाडली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here