कोल्हापूर (प्रतिनिधी रहीम पिंजारी) | यंदा मान्सून लांबणीवर पडल्याने आणि काळम्मावाडी धरणातील पाणी पातळी खालावल्याने कोल्हापूर शहरावर पाणीटंचाईचे सावट गडद झाले आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या शहर पाणी पुरवठा विभागाने मोठा निर्णय घेतला असून, संपूर्ण शहरात आता ‘एक दिवसाआड’ पाणीपुरवठा केला जाणार आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
‘अल-निनो’च्या प्रभावामुळे यंदा पावसाचे आगमन लांबले आहे. परिणामी, कोल्हापूरची जीवनवाहिनी असलेल्या काळम्मावाडी धरणातील पाणी पातळी कमालीची खाली गेली आहे. पाणी पातळी खालावल्यामुळे थेट पाईपलाईनद्वारे होणारा उपसा सध्या तांत्रिकदृष्ट्या बंद झाला आहे. सद्यस्थितीत शिंगणापूर, बालिंगा आणि नागदेववाडी या उपसा केंद्रांवरून शहराला पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, नदीपात्रातील उपलब्ध पाणी आणि पावसाची अनिश्चितता पाहता, पाणी कपातीशिवाय पर्याय उरलेला नाही.
महानगरपालिकेने शनिवार, १३ जून २०२६ आणि रविवार, १४ जून २०२६ पासून शहराचे दोन गटांत विभाजन केले आहे. गट १ (शनिवारपासून एक दिवसाआड): यामध्ये आझाद गल्ली, मटण मार्केट, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, रविवार पेठ, सुतार वाडा, भवानी मंडप, टेंभी रोड, फुलेवाडी रिंगरोड, जवाहर नगर, पाचगाव, भगवा चौक आणि कसबा बावडा या परिसराचा समावेश आहे. गट २ (रविवारपासून एक दिवसाआड): यामध्ये महाद्वार रोड, रंकाळा टॉवर, शिवाजी पेठ, गुजरी, गंगावेश, सिद्धांतरनगर, साने गुरुजी वसाहत, राजारामपुरी (संपूर्ण), सायबर चौक, स्टेशन रोड, मार्केट यार्ड आणि ताराबाई पार्क या भागांचा समावेश आहे.
धरणातील उपलब्ध पाणीसाठा पुढील काही काळ पुरवण्यासाठी ही कपात अनिवार्य आहे. नागरिकांनी नळ सोडून ठेवणे, गाड्या धुणे किंवा पिण्याच्या पाण्याचा इतर कामांसाठी वापर करणे टाळावे. “पावसाचे आगमन होईपर्यंत कोल्हापूरकरांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरावा,” असे आवाहन कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.







