जळगाव (संपादक सुनिल पाटील) | आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी आणि आगामी निवडणुकांमध्ये यशाची रणनीती आखण्यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष (पश्चिम) ॲड. अविनाश भालेराव हे १४ जून ते १६ जून २०२६ या कालावधीत जिल्ह्याचा झंझावाती तीन दिवसीय दौरा करणार आहेत.
या दौऱ्यात ते विविध तालुक्यांमध्ये जाऊन स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जनतेशी थेट संवाद साधणार असून, निवडणुकांच्या पूर्वतयारीचा आढावा घेणार आहेत.
रविवारी १४ जूनला सकाळी ११ ला एरंडोल, दुपारी २ ला धरणगाव, संध्याकाळी ५ अमळनेर, सोमवारी १५ जूनला सकाळी ११ वाजता चाळीसगाव, दुपारी २ भडगाव, संध्याकाळी ५ पाचोरा, मंगळवार दि. १६ जून दुपारी १२ वाजता पारोळा, संध्याकाळी ५ वाजता जळगाव ग्रामीण अशा सर्व तालुक्यांमध्ये आयोजित या विशेष बैठकांमध्ये प्रामुख्याने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठीची प्रभागरचना, उमेदवारी आणि पक्षाची रणनीती यावर सविस्तर चर्चा केली जाईल. तसेच स्थानिक पातळीवरील प्रश्न आणि संघटनात्मक फेरबदल यांवरही मते जाणून घेतली जातील. पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश मिळवण्यासाठी हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
या दौऱ्यातील सर्व बैठकांसाठी जिल्ह्यातील सर्व आजी-माजी आमदार, आजी-माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, तालुकाध्यक्ष, शेतकी संघ व कृषी उत्पन्न बाजार समितीचे आजी-माजी सदस्य, प्रदेश पदाधिकारी, जिल्हा कार्यकारी सदस्य, काँग्रेस पक्षाचे सर्व जुने-जाणते, प्रामाणिक व एकनिष्ठ कार्यकर्ते तसेच युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, सेवादल, NSUI, अल्पसंख्याक आणि इंटक (INTUC) या सर्व सेलच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपापल्या तालुक्यात वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हा सरचिटणीस बाबा देशमुख यांनी केले आहे.







