जळगाव (संपादक सुनिल पाटील) | सोशल मीडियाच्या माध्यमातून करमणूक करून घेणाऱ्या नागरिकांची आता एका नव्या क्लृप्तीद्वारे ऑनलाईन आर्थिक लूट केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फेसबुकवर वेगवेगळ्या मालिका (सिरीयल्स) पाहण्याच्या नादात नागरिकांची मोठी फसवणूक होत असून, जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रातील सर्व नागरिकांनी यापासून सावध राहावे, असे विनम्र आवाहन ‘पोलीस टाईम’चे कार्यकारी संपादक तथा धरणगावचे माजी नगराध्यक्ष पी. एम. पाटील सर यांनी केले आहे.
स्वतः पाटील सर यांना या ऑनलाईन फसवणुकीचा फटका बसला असून, एका जागरूक पत्रकाराच्या नात्याने त्यांनी जनतेला सावध करण्यासाठी आपला हा कटू अनुभव जाहीर केला आहे. आजकाल अनेक नागरिक, महिला, तरुण आणि विद्यार्थी रात्रीच्या वेळी किंवा फावल्या वेळात मोबाईलवर फेसबुक पाहत असतात. फेसबुकवर स्क्रोल करताना ‘मास्टर कुमकुम’, ‘मोहल्ला’, ‘खोटे बोल’ यांसारख्या विविध मनोरंजक मालिकांचे छोटे व्हिडिओ समोर येतात. या मालिकांमध्ये पुढे काय होणार, या उत्सुकतेपोटी प्रेक्षक ते व्हिडिओ सलग १५-२० मिनिटे पाहत राहतात.
मालिका रंगात आलेली असतानाच अचानक स्क्रीनवर एक जाहिरात येते; ज्यामध्ये ‘पुढील मालिका पाहण्यासाठी तुमच्या फोनपे (PhonePe) वरून फक्त १ रुपया भरा’ असा मेसेज दाखवला जातो. प्रेक्षकही मनोरंजनाच्या ओघात सहजपणे तो १ रुपया ऑनलाईन भरतात. पण, हाच १ रुपया बँक खाते रिकामे करणारा सापळा ठरतो. १ रुपया कट झाल्याचे दाखवून बँक खात्यातून परस्पर हजारो रुपये उडवले जातात आणि ग्राहकाला याची पुसटशी कल्पनाही येत नाही.
ज्येष्ठ पत्रकारालाच बसला ₹३,३०० चा फटका
“माझ्या स्वतःच्या अनुभवातून मी हे सांगत आहे. गेल्या १५ दिवसांत माझ्या नकळत माझ्या खात्यातून ३,३०० रुपये कापले गेले. जेव्हा मी मोबाईल बँकिंगची हिस्टरी तपासली, तेव्हा मला हा प्रकार समजला. जर माझ्यासारख्या एका पत्रकारासोबत हे घडू शकते, तर ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचे काय होत असेल? म्हणूनच मी हा प्रकार उघडकीस आणत आहे.”
— पी. एम. पाटील सर (माजी नगराध्यक्ष व कार्यकारी संपादक, पोलीस टाईम)
या फसवणुकीनंतर पाटील सरांनी तातडीने ‘महाराष्ट्र सायबर क्राईम, मुंबई’ च्या 1930 (१९३०) या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून माहिती घेतली. सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा आपण १ रुपया भरण्यासाठी क्लिक करतो, तेव्हा नकळत आपण त्या अनोळखी चॅनेलला किंवा सबस्क्रिप्शनला आपल्या खात्यातून पैसे ऑटो-डेबिटकरण्याची परवानगी देऊन बसतो.
सायबर फसवणुकीपासून वाचण्यासाठी आपल्या फेसबुक किंवा संबंधित पेमेंट ॲपच्या (PhonePe/Google Pay) सेटिंग्जमध्ये जाऊन जर कोणतेही ऑटो-पेमेंट किंवा ऑटो-ओटीपी (Auto-OTP) पर्याय ऑन झाले असतील, तर ते तातडीने ‘ऑफ’ (Off) करून घ्या. फेसबुकवर ‘पुढे पाहण्यासाठी १ रुपया द्या’ किंवा ‘पैसे जिंकण्यासाठी क्लिक करा’ अशा कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. नियमितपणे आपल्या बँक खात्याचे स्टेटमेंट आणि ऑनलाईन ट्रान्झॅक्शन हिस्टरी तपासत राहा. डिजिटल पेमेंट किंवा सोशल मीडिया सेटिंग्ज समजून घेण्यासाठी घरातील सुशिक्षित तरुण किंवा सायबर तज्ज्ञांची मदत घ्या.
जर तुमचीही अशी फसवणूक झाली असेल, तर वेळ न घालवता तात्काळ 1930 या नंबरवर कॉल करून सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवा, असे आवाहनही पाटील सरांनी केले आहे.







