जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर शरद चव्हाण) | मतदार यादी विशेष पुनरीक्षण (एसआयआर) अभियानाला पाळधी परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पाळधी खुर्द व पाळधी बुद्रुक येथे आयोजित विशेष शिबिरांमध्ये दिवसभर मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवून आपली एसआयआर प्रक्रिया पूर्ण केली. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेमुळे मतदार यादी अद्ययावत करण्याच्या कामाला मोठी गती मिळाली आहे.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी पाळधी खुर्द येथील शासकीय विश्रामगृह तसेच पाळधी बुद्रुक येथील श्रीराम मंदिर परिसरातील शिबिरांना प्रत्यक्ष भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. यावेळी त्यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, “लोकशाही बळकट करण्यासाठी अचूक आणि अद्ययावत मतदार यादी अत्यंत महत्त्वाची आहे. कोणताही पात्र मतदार या प्रक्रियेपासून वंचित राहू नये, यासाठी प्रत्येक नागरिकाने एसआयआर प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे.”
या अभियानात युवा नेते प्रतापराव पाटील यांनी दिवसभर शिबिरस्थळी उपस्थित राहून संपूर्ण कामकाजावर बारकाईने लक्ष ठेवले. नागरिकांना आवश्यक कागदपत्रांचे मार्गदर्शन करणे, अर्ज भरण्यास मदत करणे आणि अडचणींचे तत्काळ निवारण करण्यासाठी त्यांनी बीएलओ (Booth Level Officer) व बीएलए (Booth Level Agent) यांच्याशी सातत्याने समन्वय साधला.
शिवसेना, युवासेना आणि जीपीएस मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिरांचे नियोजन करण्यात आले होते. पाळधी बुद्रुक येथील श्रीराम मंदिर आणि पाळधी खुर्द येथील शासकीय विश्रामगृह येथे सकाळपासूनच नागरिकांची रीघ लागली होती. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांगांसाठी स्वतंत्रपणे सहकार्याची व्यवस्था करण्यात आली होती, ज्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
पाळधी परिसरात आतापर्यंत सुमारे ४० ते ५० टक्के एसआयआर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. येत्या २५ जुलैपर्यंत १०० टक्के काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यासाठी कार्यकर्त्यांची पथके पुढील काही दिवस थेट घराघरांत जाऊन जनजागृती करणार आहेत.
यावेळी बोलताना प्रतापराव पाटील म्हणाले, “एसआयआर प्रक्रिया ही प्रत्येक मतदारासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आज आपण याला प्राधान्य दिले नाही, तर भविष्यात मतदानाचा घटनात्मक हक्क गमावण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपले राष्ट्रीय कर्तव्य समजून ही प्रक्रिया पूर्ण करावी.”
ज्या नागरिकांची एसआयआर प्रक्रिया अद्याप झालेली नाही, त्यांच्यासाठी गुरुवार, दिनांक १६ जुलै रोजी पुन्हा विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व पात्र नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून आपला मतदानाचा हक्क सुरक्षित करावा, असे आवाहन प्रतापराव पाटील यांनी केले आहे.
या मोहिमेदरम्यान धरणगावचे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, धरणगाव तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी डॉ. भावना भोसले, नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ, पाळधी बुद्रुकचे माजी सरपंच संजूभैया देशमुख, उद्योजक अनिलभैया कासट, उपसरपंच निसार देशमुख यांच्यासह शिवसेना, युवासेना, जीपीएस मित्र परिवाराचे पदाधिकारी, बीएलओ, बीएलए आणि परिसरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







