जळगाव (उपसंपादक नंदुअप्पा पाटील) | रस्त्याच्या कामाचे बिल मंजूर करून देण्यासाठी ७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना जिल्हा परिषद बांधकाम विभाग, चाळीसगाव येथील उपविभागीय अभियंता यथार्थ पांडुरंग निनावे आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कुलदीप विरूचंद गमे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात अटक केली आहे. या धडक कारवाईमुळे चाळीसगाव परिसरात आणि शासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. दोन्ही लाचखोर अधिकाऱ्यांविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या मित्राने मौजे दहिवद येथे १५ व्या वित्त आयोगांतर्गत रस्ता काँक्रिटीकरण व गाव्हाळाचे काम पूर्ण केले होते. या कामाचे एकूण १० लाख ४७ हजार ८४३ रुपयांचे बिल मंजूर होणे बाकी होते. त्यासाठी मोजमाप पुस्तिकेत (MB) नोंदी करून मूल्यांकन करणे आवश्यक होते. संबंधित फाईल पुढील कार्यवाहीसाठी उपविभागीय अभियंता यथार्थ निनावे यांच्याकडे पाठवण्यात आली होती.
३ जुलै २०२६ रोजी तक्रारदाराने निनावे यांची भेट घेतली असता, कामाचे बिल मंजूर करण्यासाठी एकूण बिलाच्या १ टक्के रकमेची लाच मागितल्याचा आरोप आहे. त्यानंतर झालेल्या तडजोडीअंती ७ हजार रुपयांमध्ये हा व्यवहार निश्चित करण्यात आला. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी ७ जुलै रोजी धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) याबाबात रीतसर तक्रार दाखल केली.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर धुळे ‘एसीबी’च्या पथकाने चाळीसगावात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे उपविभागीय अभियंता निनावे यांनी तक्रारदाराकडून ७ हजार रुपयांची लाचेची रक्कम त्यांचे सहाय्यक कुलदीप गमे यांच्या हस्ते स्वीकारली. लाचेची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने दोघांनाही रंगेहात ताब्यात घेतले.
ही यशस्वी कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक कविता फडतरे व प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे तसेच त्यांच्या पथकातील अंमलदार राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, मकरंद पाटील, रामदास बारेला, प्रविण पाटील आणि जगदीश बडगुजर यांनी पार पाडली.







