दशावतार कलाकारांच्या प्रश्नांवर प्रशासनाची चौकशी करणार; सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांचे निर्देश

दशावतार

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) | कोकणच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे प्रतिनिधित्व करणारी दशावतार लोककला राज्यासह जगभर पोहोचविण्याचे मोठे कार्य कलाकार करत आहेत. या कलाकारांचे योगदान अमूल्य असून त्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे स्पष्ट प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले आहे. दरम्यान, दशावतार कलाकारांच्या मागण्यांबाबत प्रशासकीय स्तरावर झालेल्या दिरंगाईची सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले की, २६ मे २०२५ रोजी झालेल्या बैठकीत दशावतार कलाकारांच्या विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली होती. यामध्ये कलाकारांना दिले जाणारे अनुदान प्रत्यक्ष कलाकारांपर्यंत पोहोचावे, दशावतार कलाकारांची अधिकृत नोंदणी व्हावी, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व दशावतार मंडळांची पडताळणी करण्यात यावी, अशा प्रमुख मागण्यांचा समावेश होता.

या बैठकीनंतर १२ ऑगस्ट २०२५ रोजी शासनाने महत्त्वाचा निर्णय घेत लोककला पॅकेज आणि दशावतारविषयक शिफारशींसाठी राज्यस्तरीय समिती गठीत केली होती. या समितीमध्ये देवेंद्र नायक, दत्तप्रसाद शेणे, संतोष शिरोडकर, राजाराम झोरी आणि शरद मोचेमाडकर यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला होता. मात्र, या निर्णयाला एक वर्ष उलटल्यानंतरही प्रशासकीय स्तरावर अपेक्षित कार्यवाही झाली नसल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणातील दिरंगाईची सांस्कृतिक विभागाच्या सचिवांमार्फत चौकशी करण्यात येईल आणि आवश्यकता भासल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा ॲड. शेलार यांनी दिला.

दशावतार कलाकारांसाठी भांडवली गुंतवणूक तसेच प्रयोगांसाठी अनुदानाची योजना शासनाकडे उपलब्ध असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी नमूद केले. १ जानेवारी २००८ च्या शासन निर्णयानुसार पूर्णवेळ तमाशा, हंगामी तमाशा, दशावतार, खडीगम्मत, शायरी, संगीत बारी या सर्व लोककलांसाठी भांडवली अनुदान तसेच प्रत्येक प्रयोगासाठी स्वतंत्र अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेची अधिक प्रभावी अंमलबजावणी करून दशावतार कलाकारांना त्यांचा हक्क आणि न्याय मिळवून देण्यासाठी शासन सर्व आवश्यक पावले उचलेल, अशी ग्वाही मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली आहे.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here