पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; यवत हद्दीतून ३ गावठी पिस्तूल व १५ काडतुसांसह तिघांना अटक

पुणे ग्रामीण पोलिसांची

दौंड (तालुका क्राइम रिपोर्टर विकास साळुंके) | पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि यवत पोलीस स्टेशनच्या पथकाने संयुक्तरीत्या मोठी कारवाई करत यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भांडगाव गावच्या हद्दीतून तीन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून ३ अवैध गावठी पिस्तूल, १५ जिवंत काडतुसे आणि एक बलेनो कार असा एकूण ५,३७,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी मंगेश शंकर मासोळे (वय २४ वर्षे),  सुरज संजय शेलार (वय २६ वर्षे), रोहित प्रेमदास भुजवणे (वय २४ वर्षे), (सर्व रा. यवत ता. दौंड, जि. पुणे) यांना ताब्यात घेतले आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा आणि पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी बेकायदेशीर हत्यारे बाळगणाऱ्या व गुन्हे करणाऱ्यांवर विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार, ७ जुलै २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, भांडगाव परिसरात एका पांढऱ्या रंगाच्या विना नंबरच्या बलेनो कारमध्ये तीन इसम असून त्यांच्याकडे अवैध गावठी पिस्तूल आहेत. मिळालेल्या माहितीची खात्री पटल्यानंतर पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने दोन पंचांना बोलावून तातडीने सापळा रचला.

भांडगाव गावातील सोनाक्षी मंगल कार्यालयासमोरील परिसरात पोलिसांनी अत्यंत शिताफीने पांढऱ्या रंगाची बलेनो कार थांबवली. कारमधील तिन्ही संशयितांची चौकशी करून त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे प्रत्येकी एक याप्रमाणे ३ गावठी पिस्तूल, १५ जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी विना नंबरची बलेनो कार आणि शस्त्रे असा एकूण ५ लाख ३७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी यवत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजि. नंबर ६९२/२०२६ नुसार भा.न्या.सं. कलम ३, ७, २५ प्रमाणे गुन्हा नोंदवून आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे गावठी पिस्तूल त्यांनी कुठून आणले आणि ते बाळगण्यामागे त्यांचा नेमका काय हेतू होता, याचा पुढील तपास पोलीस करत आहेत. आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार (बारामती विभाग) व उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस (दौंड विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद खोरसने, यवतचे पो.नि. संतोष तासगावकर, स्था.गु.शा.चे पोसई महेश डोंगरे तसेच अंमलदार सचिन घाडगे, आसिफ शेख, तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, राजू मोमीन, विकास पाटील, गुरुनाथ गायकवाड, सुभाष राऊत, योगेश नागरगोजे, विकास कापरे व यवत पो.स्टे. चे संदीप देवकर, धीरज जाधव, मोहन मानमते यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here