छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी सुजित खंडाळे) । सक्तवसुली संचालनालय (‘ईडी’) आणि मुंबई पोलिसांच्या चौकशीची भीती दाखवून शहरातील एका ८४ वर्षीय निवृत्त प्राध्यापकाची तब्बल ३२ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य सायबर टोळीचा बेगमपुरा पोलिसांनी अखेर पर्दाफाश केला आहे. नऊ महिन्यांच्या अथक आणि तांत्रिक तपासानंतर पोलिसांनी गुजरातमधील जुनागढ येथून दोन मुख्य आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. सहाय्यक पोलीस आयुक्त सागर देशमुख यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत या मोठ्या कारवाईची माहिती दिली.
पोलिसांनी या प्रकरणी राजेशकुमार कांजीभाई वडालिया (वय ५२) आणि कनुभाई पुनाभाई चोटानी (वय ४५, दोघे रा. जुनागढ, गुजरात) यांना अटक केली आहे. या सायबर फसवणूक रॅकेटमधील तिसरा आरोपी दिपेनकुमार गिरीशभाई टिलवा हा अद्याप फरार असून, पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जयसिंगपुरा भागातील रहिवासी असलेले सुदाम वामनराव राजभोज (वय ८४) हे सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत. सप्टेंबर २०२५ मध्ये सायबर भामट्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. “मुंबईच्या कुलाबा पोलीस ठाण्यात तुमच्याविरोधात गुन्हा दाखल आहे,” असे सांगून भामट्यांनी त्यांना धमकावण्यास सुरुवात केली. अवैध संपत्ती, मनी लॉन्ड्रिंग आणि ईडी चौकशीचे भय दाखवत स्वतः केंद्रीय तपास यंत्रणांशी संबंधित असल्याचे भासवले.
अटक टाळायची असेल तर तुमच्या आर्थिक व्यवहारांची पडताळणी करावी लागेल, असे सांगून वृद्ध प्राध्यापकांकडून आधी एक हस्तलिखित अर्ज लिहून घेण्यात आला. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यांची गोपनीय माहिती मिळवून, त्यांच्या नावावर असलेली २८ लाख ५० हजार रुपयांची मुदत ठेव (FDR) मोडण्यास भाग पाडले. ही सर्व रक्कम आरटीजीएस (RTGS) द्वारे आरोपींच्या बँक खात्यांवर वर्ग करण्यात आली. इतर व्यवहारांसह भामट्यांनी एकूण ३२ लाख ५० हजार रुपये उकळले. विश्वास संपादन करण्यासाठी भामट्यांनी चक्क सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) बनावट पत्रही प्राध्यापकांना दाखवले होते.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर प्राध्यापकांनी बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी बँक खाती, मोबाईल क्रमांक, कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) आणि एसडीआर (SDR) चा सखोल तांत्रिक अभ्यास केला. आरोपींचे लोकेशन गुजरातमधील जुनागढ येथे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलीस पथकाने तातडीने गुजरात गाठून दोघांना ताब्यात घेतले. न्यायालयाने आरोपींना २२ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.
पोलीस तपासात धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या बँक खात्यात देशभरातील विविध सायबर गुन्ह्यांतील रक्कम जमा होत होती. एकाच दिवसात या खात्यात तब्बल ८८ लाख रुपये जमा झाल्याची नोंद पोलिसांना आढळली आहे. ही रक्कम जमा होताच ती तात्काळ इतर विविध खात्यांमध्ये वळवली जात होती. त्यामुळे या प्रकरणामागे आंतरराष्ट्रीय किंवा देशव्यापी मोठे सायबर रॅकेट कार्यरत असल्याचा पोलिसांना संशय असून, फरार तिसऱ्या आरोपीच्या अटकेनंतर अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.







