कनगरा येथे कौटुंबिक वादातून पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या; आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात

पत्नीची निर्घृण हत्या

सोलापूर (जिल्हा क्राईम रिपोर्टर राहुल मस्के) | किरकोळ कौटुंबिक वादाचे रूपांतर भीषण हत्येत झाल्याची एक धक्कादायक घटना धाराशिव जिल्ह्यातील बेंबळी परिसरातील कनगरा येथे घडली आहे. संशयित पतीने आपल्या सख्ख्या पत्नीच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करून तिची निर्घृण हत्या केली. ही घटना बुधवारी (२० मे २०२६) सकाळी उघडकीस आली असून, बेंबळी पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी पतीला तातडीने ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कनगरा येथील रहिवासी राजेंद्र जगन्नाथ ढोबळे आणि त्यांच्या पत्नीमध्ये काही दिवसांपासून किरकोळ कौटुंबिक कारणावरून वाद सुरू होते. मंगळवारी (१९ मे) रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्यात पुन्हा एकदा जोरदार भांडण झाले. या भांडणाच्या रागातून राजेंद्र ढोबळे याने घरातील धारदार शस्त्र काढून पत्नीवर थेट प्राणघातक हल्ला केला.

या हल्ल्यात पत्नीच्या मानेवर गंभीर वार झाल्याने अतिरक्तस्रावामुळे तिचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला. रात्रीच्या वेळी घरातच हा प्रकार घडल्याने शेजाऱ्यांना याची पुसटशीही कल्पना आली नाही.

बुधवारी सकाळी हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच बेंबळी पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बेंबळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य संशयित आरोपी पती राजेंद्र जगन्नाथ ढोबळे याला अटक केली असून, त्याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here