पंढरपूर (रिपोर्टर प्रकाश इंगोले) | आगामी आषाढी एकादशी आणि वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर नगरपालिकेकडून शहरात धडक अतिक्रमण विरोधी मोहीम हाती घेण्यात आली आहे. नगरपालिकेने वारंवार इशारा देऊनही अतिक्रमण न हटवल्यामुळे, अखेर प्रशासनाने ‘जेसीबी’च्या साहाय्याने धडक कारवाई करत अनेक अतिक्रमणे उद्ध्वस्त केली. मात्र, या मोहिमेमुळे स्थानिक सर्वसामान्य खोकीधारकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला असून त्यांच्याकडून नगरपालिकेचा निषेध केला जात आहे.
या संपूर्ण मोहिमेबाबत एक अत्यंत आश्चर्यकारक बाब समोर आली आहे. जनतेतून थेट निवडून आलेल्या नगराध्यक्ष डॉ. प्रणिती भालके आणि स्थानिक नगरसेवकांना या अतिक्रमण मोहिमेची कोणतीही पूर्वकल्पना अथवा माहिती न देताच प्रशासनाने ही कारवाई सुरू केल्याचा आरोप केला जात आहे. लोकप्रतिनिधींनाच या प्रक्रियेपासून दूर ठेवल्यामुळे राजकीय वर्तुळात आणि नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.
शहरात ज्या ठिकाणी वर्षभर वाहतुकीला अडथळा ठरणारे अतिक्रमण असते, ते काढणे योग्यच आहे, अशी भावना नागरिकांची आहे. परंतु, ज्या भागांत अतिक्रमण नाही किंवा भाविकांना कोणताही त्रास होत नाही, अशा भागांतील गरिबांची दुकाने आणि खोकी देखील नगरपालिकेने हटवल्याची तक्रार स्थानिक रहिवासी करत आहेत.
आषाढी वारीच्या तोंडावर रोजगाराचे साधन हिरावून घेतल्यामुळे सर्वसामान्य खोकीधारक हवालदिल झाले आहेत. लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता प्रशासनाने राबविलेल्या या ‘एकतर्फी’ मोहिमेनंतर आता या गरीब आणि छोट्या व्यावसायिकांना न्याय कोण देणार? आणि यावर नगराध्यक्ष काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण पंढरपूरचे लक्ष लागले आहे.







