सातारा शहर डी.बी. पथकाची धडक कारवाई; सराईत चोरट्याला अटक, ४ मोटारसायकली हस्तगत

सातारा

सातारा (उपसंपादक अरुण मोरे) | सातारा शहर आणि परिसरातून दुचाकी वाहने चोरणाऱ्या गुन्हेगारांविरोधात सातारा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण (D.B.) पथकाने एका सराईत चोरट्याला पाठलाग करून रंगेहात पकडले असून, त्याच्याकडून चोरीच्या एकूण ४ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

सातारा शहरात वाढत्या दुचाकी चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांनी डी.बी. पथकाला रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे पथक गस्तीवर असताना, दुचाकी चोरीतील एक सराईत चोरटा वाढे फाटा परिसरामध्ये एका मोटारसायकलवरून संशयास्पद रितीने जात असताना पोलिसांना दिसला. डी.बी. पथकाने तात्काळ त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.

पोलिसांनी पकडले तेव्हा त्याच्याकडे विनानंबर प्लेटची दुचाकी मिळून आली. त्याबाबत सखोल चौकशी केली असता, ती गाडी चोरीची असल्याचे त्याने मान्य केले. पोलिसांनी त्याला अधिक पोलिसी खाक्या दाखवताच, त्याने सातारा शहर आणि बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आणखी ३ दुचाकी चोरल्याची कबुली दिली.

त्याच्याजवळून  हिरो होंडा स्प्लेंडर (MH 11 CP 7364) – सातारा शहर (गु.र.नं. ५४६/२०२६),  होंडा शाईन (MH 11 CU 2299) – सातारा शहर (गु.र.नं. २२१/२०२६), हिरो एच.एफ. डिलक्स (MH 11 AS 4549) – बोरगाव पो.स्टे. (गु.र.नं. ३४७/२०२५),  हिरो एच.एफ. डिलक्स (MH 11 AJ 7108) – तपासावर (जप्त) हस्तगत करण्यात आल्या आहेत.

सदरची धडक कारवाई सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील आणि पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे (D.B. Team) पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पोलीस हवादार निलेश यादव, निलेश जाधव, विक्रम माने, प्रविण कडव, विकास मोरे, पोलीस नाईक पंकज मोहिते, पोलीस कॉन्स्टेबल तुषार भोसले, सागर गायकवाड, सुहास कदम, मच्छिंद्रनाथ माने, सुशांत कदम, सचिन रिटे, संतोष घाडगे, अशिकेष डोळस आणि सचिन आदमाने यांनी यशस्वीरित्या पार पाडली. पोलिसांच्या या कामगिरीमुळे दुचाकी चोरांचे धाबे दणाणले आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here