जळगावच्या ‘नूतन मराठा महाविद्यालया’चा डंका : विद्यार्थी प्रतीक निकुमची ‘इस्रो’च्या डेहराडून येथील वर्कशॉपसाठी निवड

नूतन मराठा

जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर शरद चव्हाण) | येथील नूतन मराठा महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. महाविद्यालयातील टी.वाय.बी.एस्सी. (TYBSc) चा हुशार विद्यार्थी प्रतीक अरुण निकुम याची भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) डेहराडून येथील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग’ (IIRS) च्या विशेष वर्कशॉपसाठी गौरवपूर्ण निवड झाली आहे.

नूतन मराठा महाविद्यालयाला इस्त्रोच्या (ISRO) प्रसिद्ध ‘स्टार्ट प्रोग्राम’चे (START Program) अधिकृत सेंटर मिळाले होते. या उपक्रमांतर्गत महाविद्यालयातील २५ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी अत्यंत उत्साहाने भाग घेतला होता. या कठीण आणि अभ्यासपूर्ण उपक्रमात महाविद्यालयातील तब्बल १५ विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत ‘ए’ ग्रेड (A Grade) पटकावला.

‘ए’ ग्रेड मिळवणाऱ्या या गुणवंत विद्यार्थ्यांमधून पुढील उच्चस्तरीय वर्कशॉपसाठी प्रतीक अरुण निकुम याची निवड करण्यात आली आहे. डेहराडून येथील इस्रो सेंटरमध्ये आगामी २६ जुलै रोजी हे वर्कशॉप पार पडणार असून, त्यासाठी प्रतीकला आमंत्रित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रवासासाठी लागणारा थ्री-टायर एसी (3-Tier AC) रेल्वे प्रवासखर्च आणि तेथील राहण्याचा सर्व खर्च ‘इस्रो’ सेंटर, डेहराडून यांच्या वतीने केला जाणार आहे.

प्रतीकच्या या ऐतिहासिक यशाबद्दल महाविद्यालयात त्याचे विशेष कौतुक करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख, उपप्राचार्य डॉ. के. बी. पाटील, सायन्स असोसिएशनचे अध्यक्ष व भौतिकशास्त्र विभाग प्रमुख प्रा. आर. बी. देशमुख यांच्या हस्ते प्रतीकचा गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला. प्रतीकच्या या यशामुळे केवळ महाविद्यालयाचेच नव्हे, तर संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे नाव अंतराळ संशोधन क्षेत्रात अभिमानाने उंचावले आहे. या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.प्रतीक अरुण निकुम

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here