सोलापूर (महाराष्ट्र राज्य क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) । सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या आदेशानुसार राबवण्यात येत असलेल्या नाकाबंदी व कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान बार्शी शहर पोलिसांनी बेकायदेशीर शस्त्रांविरुद्ध धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी गावठी बनावटीचे पिस्तूल, लोखंडी तलवार, धारदार चाकू आणि स्विफ्ट डिझायर कार असा एकूण ५ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका सराईत आरोपीला रंगेहाथ अटक केली आहे. विशेष म्हणजे, पकडण्यात आलेल्या आरोपीचा तडीपार कार्यकाळ नुकताच संपला होता.
दिनांक ११ ऑगस्टच्या रात्री ते १२ ऑगस्टच्या पहाटेदरम्यान बार्शी शहरात पोलिसांचे कॉम्बिंग ऑपरेशन व नाकाबंदी सुरू होती. यावेळी गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, सुभाषनगर भागातील हिरामठ हॉस्पिटल परिसरात एका कारमध्ये संशयित इसम कमरेला पिस्तूल लावून बसला असून त्याच्यासोबत इतर दोघे आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसह तत्काळ घटनास्थळी छापा टाकला. पोलिसांचे वाहन पाहताच कारमधील दोन संशयित अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले, मात्र पोलिसांनी सचिन कुमार मिरगणे (वय ३८ वर्षे, रा. सुभाषनगर, बार्शी) याला तत्परतेने ताब्यात घेतले. त्याचे दोन साथीदार राहुल अनभुले, दत्ता उंदरे (दोघे रा. बार्शी) हे फरार झाले आहेत.
पोलिसांनी आरोपीकडून गावठी बनावटीचे पिस्तूल (मॅगझिनसह): किंमत रु. ५०,०००/- लोखंडी तलवार (३३ इंच पाते असलेली): किंमत रु. ४,०००/- धारदार चाकू: किंमत रु. १,०००/- स्विफ्ट डिझायर कार (MH-14-EP-8402): किंमत रु. ५,००,०००/- असा एकूण रु. ५,५५,०००/- मुद्देमाल जप्त केला आहे.
जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करून विनापरवाना घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अजिज मनसुब शेख यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम, महाराष्ट्र पोलीस कायदा आणि भारतीय न्याय संहितेन्वये (BNS) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची यशस्वी कारवाई सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कुंभार यांच्या पथकाने पार पाडली. शहरात संशयास्पद हालचाली किंवा अवैध शस्त्रे आढळल्यास नागरिकांनी तत्काळ ‘डायल ११२’ वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.







