जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर प्रमोद रुले) | कमलादेवी जनसेवा संस्थान (रजि.), सिकर (राजस्थान) यांच्या वतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाईन सोहळ्यात जळगाव येथील सुप्रसिद्ध कायदेतज्ज्ञ, गौ-सेवाव्रती तथा ‘पृथ्वी बचाव संस्था’ या राज्यस्तरीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विजय सुरजमलजी काबरा यांना ‘कम्मु राष्ट्र गौरव सन्मान २०२६’ देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले.
डॉ. मख्खनलाल तंवर यांच्या अध्यक्षतेखाली हा राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाईन सन्मान सोहळा पार पडला. यामध्ये देशभरातील पर्यावरण, समाजसेवा, गौ-सेवा, साहित्य व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या १०१ मान्यवरांची निवड करून त्यांना ऑनलाईन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. ॲड. काबरा यांना या सोहळ्यात प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
ॲड. विजय काबरा हे सन १९९४ पासून पर्यावरण संरक्षणाच्या कार्यात सक्रिय आहेत. गौ-सेवा व सामाजिक सलोखा: २००९ पासून त्यांनी सुरू केलेल्या ‘सामूहिक गौ-सेवा एक अनुष्ठान’ या अभियानाद्वारे सर्व धर्म आणि समाजघटकांना एकत्र आणून गौ-सेवा, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक ऐक्याला नवी दिशा दिली आहे. तृतीयपंथी बांधवांकडून गौ-सेवा घडवून आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्यही त्यांनी केले आहे. जनजागृती: आकाशवाणी केंद्र तसेच विविध प्रबोधनात्मक उपक्रमांच्या माध्यमातून ते पर्यावरण, जलसंधारण व गौ-सेवेबाबत समाजात अविरत जागृती करत आहेत. ॲड. विजय काबरा यांच्या या बहुमूल्य कार्याची दखल घेत राष्ट्रीय स्तरावर त्यांचा गौरव करण्यात आल्याबद्दल महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि वित्त व वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्यासह सामाजिक, राजकीय व विधी क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.







