चोपडा शहर पोलीस ठाण्यात शांतता समिती व मोहल्ला कमिटीची बैठक संपन्न
जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर प्रमोद रुले) । आगामी ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर चोपडा शहर पोलीस ठाण्यात मोहल्ला कमिटी व शांतता समितीची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून विविध मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी चाळीसगाव परिमंडळाचे अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते उपस्थित होते. याप्रसंगी चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) सुनील पाटील, चोपडा शहर पोलीस निरीक्षक, ग्रामीण पोलीस निरीक्षक, अडावादचे सहायक पोलीस निरीक्षक, शहरातील सर्व मुस्लिम मोहल्ल्यांची पंच कमिटी, मौलवी तसेच मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत पोलीस प्रशासनाकडून ईद-ए-मिलादची मिरवणूक प्रशासनाने केवळ अधिकृत परवानगी दिलेल्या ठरवून दिलेल्या मार्गावरूनच काढण्यात यावी. मिरवणुकीदरम्यान कोणीही आक्षेपार्ह घोषणाबाजी करू नये, चिथावणीखोर इशारे करू नयेत किंवा विनाकारण अनधिकृत ध्वज फडकवू नयेत. मिरवणुकीत कोणत्याही प्रकारचे शस्त्र झळकवण्यास सक्त मनाई असून सर्वांनी पोलिसांना पूर्ण सहकार्य करावे. मिरवणुकीपूर्वी किंवा दरम्यान कोणीही दिशाभूल करणारे अथवा प्रक्षोभक व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर टाकू नयेत. अशा कृत्यांमुळे शांतता भंग झाल्यास संबंधितांवर तत्काळ कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी सूचना देण्यात आली.
सण-उत्सव शांततेत आणि सौहार्दाच्या वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनील पाटील यांनी केले.







