जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर प्रमोद रुले) । जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी पहूर पोलिसांनी धडक कारवाई करत एका सराईत दुचाकी चोराला गजाआड केले आहे. त्याच्याकडून चोरीस गेलेल्या दोन मोटारसायकलींसह एकूण ४० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पहूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा (गु.र.नं. १८७/२०२६, भा.न्या.सं. कलम ३०३(२)) तपास सुरू असताना, पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी आकाश सुभाष गुजर (वय २८ वर्षे, रा. नांदनखेडा, ता. जामनेर) याला ताब्यात घेतले. सुरुवातीला आरोपीने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवत विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता, त्याने दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी हिरो पॅशन प्रो (MH-१९-BV-८८९९) – किंमत रु. १५,०००/- हिरो स्प्लेंडर (MH-१९-DK-४०१३) – किंमत रु. २५,०००/- या दोन मोटारसायकली जप्त केल्या आहेत.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, चाळीसगावचे अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि पाचोरा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे, पोलीस उपनिरीक्षक गणेश सुस्ते, पोहेकॉ सचिन चौधरी, पोहेकॉ राहुल पाटील, पोना दीपक पाटील, पोकॉ ईश्वर कोकणे, पोकॉ सत्यवान कोळी, पोहेकॉ विकास गायकवाड व चालक पोहेकॉ हेमंत सोनवणे यांनी सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक दीपक पाटील करत आहेत. पहूर पोलिसांच्या या कामगिरीबद्दल परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.







