अकलूज पोलिसांनी लावला विजयवाडीतील सशस्त्र दरोड्याचा थरारक छडा; वेटर बनून दरोडेखोराला ठोकल्या बेड्या

अकलूज

सोलापूर (महाराष्ट्र राज्य क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) | सोलापूर ग्रामीणच्या अकलूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विजयवाडी येथे मे महिन्यात पडलेल्या अत्यंत धाडसी आणि सशस्त्र दरोड्याचा छडा लावण्यात पोलिसांना ‘फिल्मी स्टाईल’ यश आले आहे. अकलूज पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने वेटरचे वेषांतर करून मुख्य दरोडेखोरासह तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल १२ लाख ४७ हजार ५४६ रुपये किमतीचे ८४.७६ ग्रॅम वितळवलेले सोने जप्त करण्यात आले असून, या टोळीतील आणखी चार आंतरजिल्हा सराईत गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, १७ मे २०२६ रोजी मध्यरात्री १ ते २ वाजण्याच्या सुमारास विजयवाडी (ता. माळशिरस) येथील रहिवासी प्रदिपसिंह शंकरराव कदम (वय ६८ वर्षे) यांच्या घरात चार अनोळखी शस्त्रधारी दरोडेखोरांनी प्रवेश केला. दरोडेखोरांनी फिर्यादीच्या छातीला गलोल लावून मारहाण करण्याची भीती दाखवत महिलांच्या अंगावरील दागिने आणि कपाटातील रोख रक्कम लुटून नेली होती.

तपासात समोर आले की, आरोपी प्रकाश भगवे या स्थानिक गुन्हेगाराने या घराची पूर्ण ‘रेकी’ केली होती. घरात केवळ वृद्ध दांपत्य आणि त्यांची वयोवृद्ध सासू राहत असल्याने मोठा प्रतिकार होणार नाही, याची खात्री त्याने टोळीला दिली होतीगुन्हा घडल्यापासून मुख्य आरोपी पोलिसांना सतत गुंगारा देत होता. दरम्यान, हा आरोपी धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील एका हॉटेलमध्ये येणार असल्याची पक्की माहिती अकलूज पोलिसांना मिळाली. पोलिसांनी वेळ न घालवता तिथे सापळा रचला. आरोपीला शंका येऊ नये म्हणून तपास पथकातील पोलिसांनी थेट हॉटेलमध्ये वेटरचे कपडे घालून काम करण्यास सुरुवात केली. आरोपी हॉटेलमध्ये येताच वेटरच्या वेषातील पोलिसांनी त्याच्यावर झडप घालून त्याला अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले.

अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी लुटलेले सोने धाराशिव येथील एका सोनार साथीदाराला विकले होते. पोलिसांनी तात्काळ धाराशिव गाठून सोनार निलेश चव्हाण याला अटक केली. या सोनाराने गुन्ह्याचा कोणताही पुरावा उरू नये म्हणून सोन्याचे दागिने तात्काळ वितळवून त्याचे सोन्याचे शिक्के (बिस्किटे) तयार केले होते आणि ते दुसऱ्या सोनाराला विकले होते. पोलिसांनी हे वितळवलेले ८४.७६ ग्रॅम सोने जप्त केले आहे.

पोलिसांनी  आशिष बप्पा काळे (रा. डिकसळ, ता. कळंब, जि. धाराशिव) — मुख्य दरोडेखोर,  प्रकाश कैलास भगवे (रा. विजयवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) — रेकी करणारा स्थानिक साथीदार, निलेश महादेव चव्हाण (रा. कळंब, जि. धाराशिव) — चोरीचे सोने घेणारा सोनार यांना ताब्यात घेतले असून, या गुन्ह्यात आणखी चार आंतरजिल्हा सराईत दरोडेखोरांची नावे निष्पन्न झाली असून, त्यांच्यावर वेगवेगळ्या जिल्ह्यांत गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलीस सध्या त्यांच्या मागावर आहेत.

सदरची कौतुकास्पद कामगिरी विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये अकलूजचे पोलीस निरीक्षक नीरज उबाळे, सपोनि विक्रम साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम, पोहेकॉ सुहास क्षिरसागर, विक्रम घाडगे, शिवकुमार मदभावी, विनोद साठे, दत्ता खरात, सोमनाथ माने, पंडित गवळे, तुकाराम माने देशमुख आणि सायबर शाखेचे प्रवीण मेटकरी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम करत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here