जळगाव | संपादक (सुनील पाटील) | अकोला येथे कार्यरत असलेले आणि जळगावचे मूळ रहिवासी असलेले मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांच्या लाचखोरी प्रकरणाला आता एक मोठे आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. नाशिक आणि जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) संयुक्त पथकाने जळगावमधील त्यांच्या सीलबंद निवासस्थानाची ‘इन-कॅमेरा’ झाडाझडती घेतली. अत्यंत गोपनीय पद्धतीने पार पडलेल्या या कारवाईत सोने, चांदी, रोकड आणि मालमत्तेची कागदपत्रे असे एकूण २ कोटी ९४ लाख ६४ हजार ८४७ रुपयांचे घबाड एसीबीच्या हाती लागले आहे.
काही दिवसांपूर्वी किरण चौधरी यांच्यावर अकोला येथे लाचखोरीप्रकरणी एसीबीने कारवाई केली होती. त्यानंतर जळगाव शहरातील साईप्रभा आर्केड अपार्टमेंटमधील त्यांचे निवासस्थान सील करण्यात आले होते. मात्र, यादरम्यान चौधरी यांच्या दोन नातेवाईकांनी सीलबंद घरात घुसून पुरावे नष्ट करण्याचा धक्कादायक प्रयत्न केला. जिल्हापेठ पोलिसांनी तत्काळ कारवाई करत या दोघांना रंगेहाथ ताब्यात घेतले होते. या घटनेनंतर घराभोवती पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
गुरुवारी दुपारनंतर नाशिक आणि जळगाव एसीबीचे विशेष पथक साईप्रभा आर्केड येथे दाखल झाले. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सीलबंद घर उघडण्यात आले आणि रात्री उशिरापर्यंत घरातील प्रत्येक खोली, कपाटे, लॉकर आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांची बारकाईने तपासणी करण्यात आली.
एसीबीच्या अधिकाऱ्यांनी घराचा कानाकोपरा तपासून सोने, चांदी, रोख रक्कम, आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे आणि इतर महत्त्वाचे साहित्य ताब्यात घेतल्याची माहिती
सूत्रांकडून मिळाली आहे. एसीबीच्या माहितीनुसार, मुद्रांक जिल्हाधिकारी चौधरी यांच्या जळगावमधील घरातून सुमारे १,५३,८४,६३० रुपये इतकी रोकड जप्त करण्यात आली. याशिवाय ६०,५७,१३५ रुपये किमतीचे ४२२ ग्रॅम सोन्याचे दागिने, ३१,४१६ रुपये किमतीचे चांदीचे दागिने,६२,१३,३७६ रुपये किमतीचे स्वतः व नातेवाईकांच्या नावावरील मालमत्तेची कागदपत्रे, ११,५२,७४५ रुपये किमतीच्या सोने खरेदीच्या पावत्या तसेच ६,२५,५४५ रुपये किमतीच्या घरगुती वस्तू जप्त करण्यात आल्या. अशा प्रकारे एकूण २,९४,६४,८४७ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या संपूर्ण कारवाईदरम्यान परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती. कारवाईच्या वेळी बाहेरील कोणत्याही व्यक्तीला अपार्टमेंटमध्ये प्रवेश देण्यात आला नव्हता. एसीबीने रोख रकमेसह आर्थिक व्यवहारांशी संबंधित अनेक महत्त्वाचे दस्तऐवज आणि कागदपत्रे ताब्यात घेतली असून, या कारवाईमुळे लाचखोर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणी पुढील तपास एसीबीचे पथक करत आहे.







