सोलापूर (जिल्हा क्राईम रिपोर्टर राहुल मस्के) | शेतातील सामायिक बोरवेलच्या कारणावरून झालेल्या भीषण वादातून सख्ख्या भावानेच आपल्या भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धाराशिव जिल्ह्यातील कार्ला येथे घडलेल्या या रक्ताळलेल्या कुटुंबकलहामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात कुटुंबातील इतर तीन सदस्यही जखमी झाले असून, एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. ब्रह्मदेव बब्रुवान मोठे असे हत्या झालेल्या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कार्ला येथील रहिवासी ब्रह्मदेव मोठे आणि त्यांचा सख्खा भाऊ विष्णू मोठे यांच्या शेतात सामायिक बोरवेल आहे. घटनेच्या दिवशी ब्रह्मदेव मोठे यांनी विष्णू मोठे यांच्याकडे ‘बोरवेलची मोटार का काढली?’ अशी विचारणा केली. याच साध्या कारणावरून दोन्ही भावांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. पाहता पाहता या वादात दोन्ही बाजूची कुटुंबे आमनेसामने आली आणि वादाचे रूपांतर हिंसक हाणामारीत झाले.
दोन्ही बाजूंनी झालेल्या या जीवघेण्या हाणामारीत ब्रह्मदेव मोठे यांना गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या हिंसक संघर्षात ब्रह्मदेव यांच्या कुटुंबातील मुलगा महेश ब्रह्मदेव मोठे (वय २५), अनिता ब्रह्मदेव मोठे (वय ५०) आणि अमोल थोरात (वय २७) हे गंभीर जखमी झाले आहेत. यापैकी महेश मोठे याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून, त्याच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच धाराशिव पोलिसांनी तात्काळ कार्ला गावात धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य संशयित आरोपी विष्णू मोठे, गौतम मोठे, तसेच पुतणे योगेश मोठे आणि मनोज मोठे यांना तात्काळ ताब्यात घेतले आहे. पोलीस सध्या या सर्व संशयितांची कसून चौकशी करत असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एका सामायिक बोरवेलच्या वादाने सख्खे नाते रक्ताने माखल्यामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.







