कोल्हापूर (प्रतिनिधी नियाज जमादार) | सोशल मीडियावरील एका ग्रुपवर केलेल्या कमेंटच्या रागातून २९ वर्षीय तरुणाची चाकू भोसकून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथे घडली आहे. या थरारक घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र खळबळ उडाली असून, जयसिंगपूर पोलिसांनी तत्परता दाखवत मुख्य संशयित आरोपीला अटक केली आहे. साहिल जाकीर काझी (वय २९) असे खून झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे, तर राजू लक्ष्मण कांबळे (वय ३०) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत साहिल काझी आणि आरोपी राजू कांबळे यांच्यात गाडीच्या कर्जाचे हप्ते भरण्यावरून आधीपासूनच जुना वाद सुरू होता. त्यातच, सोशल मीडियावरील एका ग्रुपवर काही कमेंट्स करण्यात आल्याने हा वाद अधिकच चिघळला आणि दोघांमधील शत्रुत्व वाढले.
सोशल मीडियावरील वाद मिटवण्यासाठी आणि यावर चर्चा करण्यासाठी आरोपी राजू कांबळे याने साहिल आणि त्याचा मित्र कार्तिक कलकुटगी या दोघांना बोलावून घेतले होते. त्यानुसार ते सर्व जयसिंगपूर येथील मुख्य पोस्ट ऑफिसच्या मागील बाजूच्या रस्त्यावर एकत्र आले. मात्र, चर्चा सुरू असताना वाद मिटण्याऐवजी पुन्हा पेटला. रागाच्या भरात राजू कांबळे याने अचानक तीक्ष्ण चाकू काढून साहिलच्या छातीवर आणि दंडावर सपासप वार केले. साहिल रक्ताच्या थारोळ्यात कोसळताच आरोपी राजू घटनास्थळावरून पसार झाला.
गंभीर जखमी झालेल्या साहिलला त्याचा मित्र आणि स्थानिकांच्या मदतीने तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र दुर्दैवाने उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी वेगवेगळी पथके रवाना करून संशयित आरोपी राजू कांबळे याला काही तासांतच बेड्या ठोकल्या.
सोशल मीडियावरील त्या ग्रुपवर नेमक्या कोणत्या कमेंट्स झाल्या होत्या? आणि तो ग्रुप कोणत्या उद्देशाने वापरला जात होता, याचा सखोल तपास आता पोलिसांकडून केला जात आहे. या घटनेमुळे डिजिटल माध्यमांवरील वादाचे हिंसक पडसाद उमटत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.







