कोल्हापूर (प्रतिनिधी नियाज जमादार) | लग्नाचे आमिष दाखवून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अत्याचारामुळे सदर अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली असून, याप्रकरणी पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संशयित आरोपीने १७ वर्षीय अल्पवयीन पीडितेला लग्नाचे खोटे आमिष दाखवले आणि फूस लावून पळवून नेले. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध तिचे शारीरिक व लैंगिक शोषण करण्यात आले. या सततच्या अत्याचारामुळे पीडित अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्याचे उघडकीस आले, ज्यानंतर हा संपूर्ण प्रकार चव्हाट्यावर आला.
हा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर पीडित कुटुंबीयांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी पेठ वडगाव पोलिसांनी मुख्य संशयित आरोपीसह त्याला मदत करणाऱ्या एकूण चार जणांविरुद्ध विविध कलमान्वये आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पेठ वडगाव पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास अत्यंत वेगाने करत असून, आरोपींचा शोध सुरू आहे.







