जळगाव (संपादक सुनिल पाटील) | अवैध सावकारी प्रकरणी अनुकूल अहवाल पाठवण्यासाठी आणि पुढील सुनावणीची तारीख देण्यासाठी तब्बल ५ लाख रुपयांची लाच मागून, तडजोडीअंती पहिला हप्ता म्हणून १ लाख ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना जळगाव येथील उपनिबंधक (सहकार खाते, वर्ग-१) जगदीश बाबूराव बारी आणि त्यांच्या सांगण्यावरून लाच स्वीकारणारा खाजगी इसम देविदास धनसिंग पाटील यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
याप्रकरणी उपनिबंधक जगदीश बाबूराव बारी (वय ५६, रा. भुसावळ) आणि खाजगी इसम देविदास धनसिंग पाटील (वय ४४, मानद कार्यकारी अधिकारी, जळगाव जिल्हा बँक असोसिएशन) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्यावर अवैध सावकारीच्या अनुषंगाने उपनिबंधक कार्यालयात सुनावणी सुरू होती. तक्रारदार व त्यांच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल होऊ नये आणि चौकशी अहवाल अनुकूल पाठवावा, यासाठी उपनिबंधक जगदीश बारी यांनी सुरुवातीला ५ लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदार यांची लाच देण्याची अजिबात इच्छा नसल्याने त्यांनी १८ मे २०२६ रोजी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) रीतसर तक्रार नोंदवली.
एसीबीने १८ मे रोजीच या तक्रारीची पडताळणी केली. या पडताळणी दरम्यान उपनिबंधक बारी यांनी ५ लाखांवरून तडजोडीअंती ३ लाख रुपये घेण्याचे मान्य केले. तसेच, “मागच्या वेळी वकील लावून आमचे नुकसान केले, म्हणून नकारात्मक अहवाल दिला होता. पण आता अनुकूल अहवाल देतो,” असे सांगत लाचेचा पहिला हप्ता १ लाख ५० हजार रुपये आरोपी देविदास पाटील यांच्याकडे देण्यास सांगितले.
लाचेची रक्कम आज, २० मे २०२६ रोजी दिली जाणार असल्याने एसीबीच्या पथकाने शहरातील बी. जे. मार्केटमधील जळगाव जिल्हा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स असोसिएशनच्या कार्यालयात दबा धरून सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून लाचेचा पहिला हप्ता म्हणून दीड लाखांची रोकड स्वीकारताना खाजगी इसम देविदास पाटील याला एसीबीने रंगेहात ताब्यात घेतले.
या संपूर्ण कारवाईनंतर दोन्ही आरोपींवर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. या यशस्वी कारवाईमुळे लाचखोरांचे धाबे दणाणले आहेत.
ही कारवाई एसीबी नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली, जळगावचे पोलीस उप अधीक्षक योगेश ठाकूर यांच्या पर्यवेक्षणात पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे, अंमलदार हेमंत नागरे, बाळू मराठे, संगीता पवार, मनोज पाटील आणि सचिन चाटे यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे करत आहेत.







