‘सरहद’ संस्थेची ३० वर्षे पूर्ण; संजय नहार यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त विशेष गौरवग्रंथाचे पुणे येथे शानदार प्रकाशन
जळगाव (संपादक सुनिल पाटील)। केवळ संस्था न उभारता आपल्या कार्यातून विचारांची आणि माणुसकीची चळवळ उभी करणारे ‘सरहद’ संस्थेचे संस्थापक संजय नहार यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त आणि ‘सरहद’च्या त्रिदशकपूर्तीनिमित्त (३० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल) एका विशेष गौरवग्रंथाचा प्रकाशन सोहळा आज, गुरुवार २७ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजता स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे अत्यंत उत्साहात आणि दिमाखात पार पडला.
काश्मीरपासून ईशान्य भारतापर्यंत राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा, शांतता, आणि सांस्कृतिक जतनासाठी गेल्या चार दशकांहून अधिक काळ अविरत कार्य करणाऱ्या संजय नहार यांच्या जीवनकार्याला या सोहळ्यात उपस्थितांनी भरभरून दाद दिली.
या विशेष सोहळ्यानिमित्त संजय नहार यांच्या सहकाऱ्यांनी, मित्रपरिवाराने, ज्येष्ठ मान्यवरांनी आणि विविध क्षेत्रांतील दिग्क्तांनी त्यांच्यासोबतच्या आठवणी, अनुभव आणि मनोगतांना शब्दरूप देऊन एक सुंदर गौरवग्रंथ साकारला आहे. या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याला विविध क्षेत्रांतील मान्यवर, साहित्यिक, कलावंत आणि समाजसेवकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
सरहद संस्थेच्या माध्यमातून शिक्षण, साहित्य, कला-संस्कृती आणि सामाजिक कार्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संजय नहार यांच्या कार्याचा हा गौरव सोहळा म्हणजे त्यांच्या चार दशकांच्या निस्वार्थ राष्ट्रकार्याला मिळालेली एक अनोखी पावती ठरला. या कार्यक्रमास उपस्थित राहून अनेकांनी नहार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या पुढील सामाजिक उपक्रमांना पाठबळ जाहीर केले.







