जळगाव (उपसंपादक नंदूअप्पा पाटील) | तुझ्या भावाला मारून टाकेल अशी भीती दाखवून एका १८ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर वेळोवेळी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना जळगाव शहरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात शाकीब अस्लम पटेल (वय २०, रा. तांबापुरा, जळगाव) या संशयित तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका परिसरात राहणारी १८ वर्षीय तरुणी जळगाव शहरात महाविद्यालयीन शिक्षण घेते. संशयित आरोपी शाकीब पटेल याने तरुणीला तिच्या भावाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. या धमकीच्या बळावर त्याने पीडितेचा गैरफायदा घेत, तिला वेळोवेळी आपल्या घरी बोलावून तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार १ नोव्हेंबर २०२५ पासून ते २० मे २०२६ पर्यंत सतत सुरू होता.
या सततच्या अत्याचारामुळे पीडित तरुणी गर्भवती राहिली. ही बाब लक्षात आल्यानंतर संशयित आरोपी शाकीब याने तरुणीला जबरदस्तीने गर्भपाताच्या गोळ्या आणून दिल्या आणि त्या खाण्यास भाग पाडले.
या गंभीर मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून अखेर पीडित विद्यार्थिनीने २१ मे रोजी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून आपबिती कथन केली आणि रीतसर फिर्याद दिली. तरुणीच्या तक्रारीवरून आरोपी शाकीब पटेल याच्याविरुद्ध तात्काळ बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.







