सिल्लोड येथील परिवहन विभागाच्या कॅन्टीनवर एफडीएकडून धडक कारवाई

एफडीए

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी सुजित खंडाळे) । ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत राज्यभर खासगी आस्थापनांवर कारवाई सुरू असताना सिल्लोड येथील परिवहन विभागाच्या कँटीनवर एफडीएकडून धडक कारवाई करण्यात आली आहे. तपासणी करत असताना अस्वच्छता, उंदरांचा उच्छाद होऊ नये याकरिता जाळी लावण्यात आली नव्हती. कचरा साठवण्याची जागा योग्य नव्हती, शिवाय भांडी घासण्याची जागा देखील अतिशय अस्वच्छ आढळून आली. पावसामुळे सर्वत्र चिखल असलेली जमीन आढळली. सांडपाणी बाहेर जाण्यासाठी उतार नव्हता, शिवाय ती झाकून ठेवली नसल्याने कारवाई केल्याची माहिती एफडीएचे सह आयुक्त श्रीकांत करकळे यांनी दिली.

अन्न व औषधी प्रशासनातर्फे राज्यभर विविध आस्थापनांवर कारवाई करण्यात येत आहे. मंगळवारी विभागातर्फे सिल्लोड बस स्थानकावरील उपहारगृहाची तपासणी करण्यात आली. ग्रामीण भागातील या उपाहारगृहामध्ये गोरगरीब, शेतकरी असलेले प्रवासी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत होते. मात्र, तिथे मिळालेल्या तक्रारीनुसार, तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये आणलेल्या खाद्यपदार्थांबाबत साहित्याची नोंद होती. मात्र, विक्रीसाठी आणण्यात आलेल्या चिप्स, नमकीन आणि इतर खाद्यपदार्थांच्या खरेदीची नोंद उपलब्ध आढळली नाही.
सर्वत्र घाणीचे साम्राज्य, पोपडे निघत असलेल्या भिंती, चिखलाचे साम्राज्य आढळून आले. नागरिकांच्या आरोग्यास घातक असे वातावरण असल्याने एस. टी. कॅन्टीनवर कारवाई करत असल्याची माहिती अन्न व औषधी प्रशासन विभागाचे सह आयुक्त श्रीकांत करकळे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here