अहिल्यानगर (उपसंपादक दिपक वरखडे) | महापालिकेच्या विद्युत विभागातील कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांच्यावर मुकुंदनगर परिसरातील दर्गादायरा येथे शुक्रवारी जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यात उपचारादरम्यान रविवारी धीरज परदेशी यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अहिल्यानगर शहरात संतापाची लाट उसळली असून, हिंदुत्ववादी संघटनांनी शहर बंदची हाक दिली आहे. शहरात तणावपूर्ण शांतता असतानाच आता धीरज परदेशी हल्ला प्रकरणातील आरोपींच्या घरांवर बुलडोझर कारवाईची शक्यता निर्माण झाली आहे.
धीरज परदेशी यांच्यावर हल्ला करणारा आरोपी मुस्तकीम ख्वाजामिया सय्यद, मेहराज इब्राहिम सय्यद आणि सिराज इब्राहिम सय्यद यांच्या नागरदेवळे येथील घरांवर ग्रामपंचायत प्रशासनानं अतिक्रमणाबाबत नोटिसा बजावल्या आहेत. संबंधित बांधकाम ग्रामपंचायत हद्दीतील जागेवर तसंच ओपन स्पेसवर अनधिकृतपणे करण्यात आल्याचे नोटिसीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या नोटिसांनंतर आरोपींच्या घरांवर प्रत्यक्ष कारवाई होणार का, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.
नागरदेवळे ग्रामपंचायतीनं महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 मधील कलम 52 आणि 53 अन्वये ही कारवाई केली आहे. संबंधित मालमत्तांमध्ये अनधिकृत बांधकाम केल्याचं ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आल्याचं नोटिसीत नमूद आहे. बांधकामाची परवानगी असल्यास तिची प्रत कार्यालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अन्यथा कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा ग्रामपंचायतीनं दिला. तसंच ग्रामपंचायत मालमत्ता क्रमांक 2374 व 2517 संदर्भात अनधिकृत बांधकाम केल्याचं निदर्शनास आल्यानं हे बांधकाम तत्काळ काढून टाकण्याची कारवाई करण्यात येईल, असंही नोटिसीत स्पष्ट करण्यात आलं आहे. संबंधितांना आपलं म्हणणं आणि पुरावे सादर करण्याची संधी देण्यात आली असून, त्यानंतर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार पुढील कारवाई केली जाणार आहे.
धीरज परदेशी यांच्या मृत्यूनंतर आरोपींच्या गावात बुलडोझर कारवाई करण्याची मागणी आमदार संग्राम जगताप आणि आमदार अक्षय कर्डिले यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आली होती. आता त्याच पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीनं आरोपींच्या घरांवर अतिक्रमणाच्या नोटिसा बजावल्यानं प्रशासनानं कारवाईच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकल्याचं मानलं जात आहे.







