एव्हरेस्ट अवघ्या ५०० मीटरवर; पण कराडकरांच्या मनातील अभिमानाचे शिखर दीपक बेलवलकर यांनी सर केले

एव्हरेस्ट

मुंबई (उपसंपादक अॅड. चंद्रशेखर आठल्ये) । जगातील सर्वोच्च शिखर ‘माऊंट एव्हरेस्ट’ (८,८४८.८६ मीटर) सर करण्याचे स्वप्न उराशी बाळगून निघालेले कराडचे सुपुत्र आणि धाडसी गिर्यारोहक दीपक बेलवलकर यांना निसर्गाच्या अत्यंत खडतर आव्हानांमुळे अवघ्या ५०० मीटर अंतरावरून माघार घ्यावी लागली. एव्हरेस्टच्या अत्यंत धोकादायक मानल्या जाणाऱ्या ‘डेथ झोन’मध्ये ८,३०० मीटर (सुमारे २८,००० फूट) उंचीवर पोहोचल्यानंतर पायाच्या बोटाला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे त्यांनी सुरक्षिततेला प्राधान्य देत परतीचा धाडसी निर्णय घेतला. शिखर जरी काही अंतरावर राहिले असले, तरी त्यांनी दाखवलेली जिद्द आणि घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद ठरत असून त्यांनी देशवासियांच्या मनातील अभिमानाचे शिखर आधीच सर केले आहे.

दीपक बेलवलकर यांनी या मोहिमेसाठी स्वतःला पूर्णपणे झोकून दिले होते. दररोज सदाशिवगडावर चढाईचा सराव करणे, जिममध्ये सलग पाच ते सहा तास कठोर व्यायाम करणे आणि शारीरिक व मानसिक ताकद वाढवण्यासाठी सातत्य राखणे, अशा अथक परिश्रमांतून त्यांनी स्वतःला या जागतिक मोहिमेसाठी सिद्ध केले होते. गेल्या सुमारे ५० दिवसांपासून ते हिमालयाच्या उणे तापमान, विरळ हवा, जीवघेणे वारे आणि बर्फाच्छादित प्रदेश अशा प्रत्येक पावलागणिक वाढणाऱ्या आव्हानांचा अविश्वसनीय धैर्याने सामना करत होते.एव्हरेस्ट
शिखराच्या अंतिम टप्प्यात पोहोचले असताना दीपक बेलवलकर यांच्या पायाच्या बोटाला गंभीर जखम झाली. चालताना होणाऱ्या असह्य वेदनांमुळे त्यांना बूट काढणेही अशक्य झाले होते. याही परिस्थितीत त्यांनी हार न मानता पुढे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, एव्हरेस्टच्या अत्यंत धोकादायक “डेथ झोन”मध्ये वेळ आणि हवामानाचे गणित हुकल्यास थेट जीवाला धोका निर्माण होतो. त्यांच्यासोबत असलेल्या अनुभवी शेरपाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पुढे जाणे धोकादायक ठरू शकते, असा सल्ला दिला.”शिखरावर पोहोचण्याइतकाच सुरक्षित परत येणे हाही गिर्यारोहणाचा अत्यंत महत्त्वाचा नियम आहे. दीपक बेलवलकर यांनी घेतलेला हा निर्णय त्यांच्यातील परिपक्व आणि खऱ्या गिर्यारोहकाची साक्ष देतो.”
जगभरातील अनेक अनुभवी गिर्यारोहकांनाही हिमालयातील ८,३०० मीटरचा टप्पा गाठणे शक्य होत नाही. त्यामुळे एव्हरेस्ट शिखर अवघ्या ५०० मीटरवर असताना परतीचा निर्णय घेणे सोपे नसले, तरी दीपक बेलवलकर यांनी गाठलेली ही उंची आणि दाखवलेले शौर्य सामान्य नाही. त्यांचा हा संघर्ष, चिकाटी आणि साहस तरुण पिढीसाठी कायम प्रेरणास्थान राहील, अशा भावना क्रीडा क्षेत्रातून व्यक्त होत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here