पाचोरा (जिल्हा क्राइम रिपोर्टर शेख जावीद) | शहरातील जळगाव रोडवरील एका नामांकित लॉजिंगमध्ये भडगाव तालुक्यातील गिरड येथील २५ वर्षीय कापड दुकान व्यावसायिकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना २८ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. रवींद्र संजय मोरे (कोळी) असे मृत तरुणाचे नाव आहे. दरम्यान, ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त करत संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी मृतदेहासह पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला आणि दुसऱ्या दिवशी थेट पोलीस ठाण्यावर हल्लाबोल केला. यामुळे पाचोऱ्यात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मयत रवींद्र मोरे हा पाचोरा शहरातील भाजी मंडई येथील शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये ‘मालक मेन्स वेअर’ नावाचे रेडीमेड कापड दुकान चालवत होता. अत्यंत मिळून-मिसळून राहणाऱ्या रवींद्रचा गेल्या महिनाभरापूर्वीच त्याच्या मामाच्या मुलीशी साखरपुडा झाला होता. घरात वृद्ध आई, एक भाऊ आणि एक बहीण अशा संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी रवींद्रवरच होती. त्यामुळे तो आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलूच शकत नाही, असा ठाम दावा नातेवाईकांनी केला आहे.
२८ मे रोजी सकाळी लॉजमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्यानंतर रवींद्रला तातडीने खाजगी व नंतर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर गिरड येथील शेकडो ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी पोलीस ठाणे व ग्रामीण रुग्णालयाबाहेर गर्दी केली होती.
संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी नातेवाईक आक्रमक झाले होते. अखेर २८ मे रोजी रात्री उशिरा १२ वाजून ४१ मिनिटांनी रवींद्रच्या प्रेयसीने (पूर्ण नाव, वय ज्ञात नाही) त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी, तसेच ‘याराना लॉज’चे मालक सूरज शिंदे आणि मॅनेजर नितीन जंजाळ यांनी तिला सहकार्य केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
रवींद्रचा मृतदेह २८ मे रोजी रात्री १२ वाजता जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात ‘इन कॅमेरा’ शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. २९ मे रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास शवविच्छेदन झाल्यानंतर संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांच्या जमावाने पाचोरा पोलीस ठाण्यावर हल्लाबोल केला. यामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली.
दुपारी ३ वाजता रवींद्रचा मृतदेह शवपेटीसह पुन्हा पाचोरा पोलीस ठाण्यात आणण्यात आला. यावेळी महिलांसह प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पिंपळगाव (हरेश्वर), कासोदा आणि भडगाव पोलीस ठाण्यातील अतिरिक्त पोलीस बंदोबस्त पाचोऱ्यात पाचारण करण्यात आला होता.
सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास पोलिसांनी लॉज मालक सूरज शिंदे आणि मॅनेजर नितीन जंजाळ या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर संतप्त जमाव शांत झाला. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता रवींद्रचा मृतदेह रुग्णवाहिकेतून गिरड (ता. भडगाव) येथे नेण्यात आला आणि सायंकाळी ६ वाजता शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ करत आहेत.







