मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘President’s Cup’ प्रदान; रविंद्र माणगावे यांनी स्वीकारला महाराष्ट्र चेंबरच्या अध्यक्षपदाचा पदभार

महाराष्ट्र चेंबर

मुंबई (प्रतिनिधी सुरेश पटनाईक) |  महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर (MACCIA) च्या नवनिर्वाचित अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ मुंबईत मोठ्या उत्साहात पार पडला. या दिमाखदार सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते चेंबरचे नवनिर्वाचित अध्यक्ष रविंद्र माणगावे यांनी ‘President’s Cup’ स्वीकारून आपल्या अध्यक्षपदाचा कार्यभार अधिकृतपणे हाती घेतला.

 

‘गाव तिथे उद्योजक’ उपक्रमाचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र चेंबरच्या ‘गाव तिथे उद्योजक’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे विशेष कौतुक केले. प्रत्येक गावात नवा उद्योजक निर्माण करण्याची ही संकल्पना महाराष्ट्राच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील तरुण हातांना रोजगार मिळवून देण्यासोबतच, महाराष्ट्राला ‘ट्रिलियन डॉलर’ अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी हा उपक्रम मोलाचे योगदान देईल, असा ठाम विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

बदलत्या जागतिक परिस्थितीचा वेध घेत मुख्यमंत्र्यांनी उद्योग क्षेत्रात वेगाने विकसित होत असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. विशेषतः सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांनी (MSME) स्पर्धेत टिकून राहण्यासाठी ‘AI’ तंत्रज्ञान तातडीने आत्मसात करावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी सौरऊर्जा मॉड्यूलचा (Solar Power Module) प्रामुख्याने उल्लेख केला. हे मॉड्यूल उद्योग, शेती आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत फायदेशीर व उपयुक्त असल्याचे सांगत, हे सौरऊर्जा मॉड्यूल लवकरात लवकर महाराष्ट्र चेंबरसमोर सादर करून त्यावर सविस्तर चर्चा घडवून आणावी, अशी सूचना त्यांनी चेंबरच्या पदाधिकाऱ्यांना केली.

समारंभाच्या शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष रविंद्र माणगावे आणि त्यांच्या संपूर्ण कार्यकारी मंडळाचे मनापासून अभिनंदन केले. उद्योग, व्यापार, कृषी आणि नवउद्योजकतेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन महाराष्ट्र चेंबर राज्याच्या आर्थिक प्रगतीत अधिक प्रभावी योगदान देईल, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली. या सोहळ्याला उद्योग क्षेत्रातील अनेक दिग्गज आणि चेंबरचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here