दौंड (तालुका क्राइम रिपोर्टर विकास साळुंके) | पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि दौंड पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने गोपाळवाडी (ता. दौंड) परिसरातील एका लॉजवर छापा टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. मौजे बोरावकेनगर येथील ‘रिलॅक्स इन लॉजिंग’वर ३० मे २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ही धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत वेश्या व्यवसायासाठी डांबून ठेवलेल्या ६ महिलांची सुटका करण्यात आली असून, लॉज चालक मनोज अनिल पवार (वय ३५ वर्ष, रा. फलटण, जि. सातारा) याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांना बोरावकेनगर येथील रिलॅक्स इन लॉजिंगमध्ये महिलांकडून अनैतिक वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीची खात्री करण्यासाठी पोलिसांनी शनिवारी सायंकाळी एक बनावट ग्राहक (पंटर) लॉजवर पाठवला. बनावट ग्राहकाने पैशांचे आमिष दाखवून महिलांची मागणी केली असता, पैशांच्या मोबदल्यात शरीरसंबंध ठेवण्याची तयारी दर्शविण्यात आली. इशारा मिळताच दबा धरून बसलेल्या पोलीस पथकाने लॉजवर छापा टाकला.
पोलीस पथकाने केलेल्या या कारवाईत लॉजमधून ६ पीडित महिलांची सुटका करण्यात आली. तसेच बनावट ग्राहकाला दिलेले ५०० रुपयांच्या दोन नोटा आणि तीन कंडोम पाकिटे असा मुद्देमाल पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केला आहे. लॉज चालक मनोज पवार हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलांना डांबून ठेवून हा अनैतिक व्यवसाय चालवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार त्याच्याविरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार (प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुटका करण्यात आलेल्या सर्व महिलांना पुढील समुपदेशन व मदतीसाठी सुरक्षित स्थळी पाठवण्यात आले आहे.
सदरची यशस्वी कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली दौंडचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि दौंड पोलीस ठाण्याच्या अंमलदारांच्या संयुक्त पथकाने केली आहे. या धडक कारवाईमुळे दौंड परिसरातील अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.







