शाहूपुरी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने शोधले ७.९७ लाखांचे दागिने

शाहूपुरी पोलिसांनी

कोल्हापूर (प्रतिनिधी रहीम पिंजारी) | भाड्याने घेतलेल्या खाजगी गाडीच्या ड्रायव्हरनेच प्रवाशाचा विश्वासघात करून डिक्कीतून सुमारे ८ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मात्र, शाहूपुरी पोलिसांनी अत्यंत तातडीने तपासाची चक्रे फिरवत संशयित चालकाला अटक केली असून, चोरीला गेलेले सर्व दागिने, रोख रक्कम आणि घड्याळ हस्तगत करण्यात यश मिळवले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंड (मुंबई) येथील रहिवासी असलेले फिर्यादी हे ‘ड्रायव्हर सुविधा’ (Driver Suvidha) या मोबाईल ॲपवरून एक चालक भाड्याने घेऊन आपल्या खाजगी चारचाकी गाडीने कोल्हापूरकडे प्रवासाला निघाले होते. प्रवासादरम्यान त्यांनी खापोली आणि सातारा येथील फूड मॉलवर गाडी थांबवली होती. याच दरम्यान फिर्यादी गाडीतून उतरल्याची संधी साधून चालकाने गाडीच्या डिक्कीतून दागिने, रोकड आणि मौल्यवान घड्याळ चोरून नेले.
प्रवास पूर्ण झाल्यावर डिक्कीतील ऐवज गायब असल्याचे लक्षात येताच फिर्यादीला चालकावर संशय आला आणि त्यांनी तात्काळ पोलिसात तक्रार दाखल केली. शाहूपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल होताच प्रवासाच्या मार्गावरील फूड मॉलचे सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासले. फुटेजमध्ये तो चालक गाडी नेहमीच्या पार्किंगमध्ये पार्क न करता मुद्दाम एका बाजूला घेऊन गेल्याचे आणि डिक्की उघडून त्यातून काहीतरी काढताना स्पष्टपणे दिसून आला. या भक्कम पुराव्याच्या आधारे पोलिसांनी संशयावरून मोहन आनंदराव आडागळे (वय ६२ वर्ष, रा. सद्गुरू नगर, दिवा, जि. ठाणे) याला ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपी ड्रायव्हरची कसून आणि कायदेशीर चौकशी केली असता, अखेर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून सोन्याचे दागिने: ७,८०,०००/- रुपये किमतीचे, रोख रक्कम: १२,०००/- रुपये, लेडीज घड्याळ: ५,०००/- रुपये असा एकूण ७,९७,०००/- रुपयांचा चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर यशस्वी कामगिरी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष ढोके, पोलीस उपनिरीक्षक संजीव बंबरगेकर आणि त्यांच्या विशेष शोध पथकाने केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीवर पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here