ठाणे गुन्हे शाखेची धडक कारवाई; खारीगाव टोलनाक्याजवळ ७० लाखांचे एम.डी. ड्रग्ज आणि पिस्तूल जप्त, तिघांना अटक

ठाणे

ठाणे (उपसंपादक प्रकाश कदम) | ठाणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा घटक-१ च्या पथकाने अंमली पदार्थ तस्करांविरुद्ध एक मोठी आणि यशस्वी कारवाई केली आहे. खारीगाव टोलनाक्याजवळ सापळा रचून पोलिसांनी तब्बल ७० लाख रुपये किमतीची ५००.०५ ग्रॅम ‘एम.डी.’ क्रिस्टल पावडर हस्तगत केली आहे. या कारवाईत ड्रग्जसह एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूसही जप्त करण्यात आले असून तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. २७ मे २०२६ रोजी ठाणे गुन्हे शाखा घटक-१ चे पोलीस शिपाई सागर सुरळकर यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून एक महत्त्वाची माहिती मिळाली होती. काही इसम मुंब्यावरून मुंबईच्या दिशेने दोन मोटार स्कूटरवरून मोठ्या प्रमाणात ‘एम.डी.’ (मेफेड्रॉन) क्रिस्टल पावडर हा अंमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन जाणार असून, ते जुन्या खारीगाव टोलनाक्यावरून पसार होणार आहेत, असा हा सुगावा होता. खारीगाव टोलनाक्यावर फिल्मी स्टाईल सापळावरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेच्या पथकाने खारीगाव टोलनाका परिसरात तात्काळ गुप्तपणे सापळा लावला. संशयास्पद रितीने आलेल्या सुझुकी ॲक्सेस मोटार स्कूटर (क्रमांक MH-04-NA-1428 आणि MH-04-MX-3532) या दोन्ही गाड्यांना अडवून पोलिसांनी रहमान अब्दुल खान (वय २३ वर्षे, रा. अरुण मंजिल, जीवन बाग, मुंब्रा, ठाणे), सिद्धांत संजय तांबोली (वय ३१ वर्षे, रा. संदीप स्मृती अपार्टमेंट, बी.आर. नगर समोर, दिवा पूर्व, ठाणे), साहील नसीम खान (वय १८ वर्षे, रा. झोपडपट्टी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानाजवळ, कळवा पूर्व, ठाणे) या तीन इसमांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी या तिन्ही आरोपींची आणि त्यांच्या वाहनांची कसून झडती घेतली असता, त्यांच्याकडे व्यावसायिक विक्रीसाठी आणलेली ७०,००,०००/- रुपये किमतीची ५००.०५ ग्रॅम वजनाची ‘एम.डी.’ क्रिस्टल पावडर आढळून आली. यासोबतच पोलिसांना त्यांच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल, १ जिवंत काडतूस आणि दोन मोटार स्कूटर मिळून आल्या. जप्त करण्यात आलेल्या एकूण मालाची किंमत ७७,५५,९५०/- रुपये इतकी आहे.
या प्रकरणी २८ मे २०२६ रोजी कळवा पोलीस ठाण्यात एनडीपीएस ॲक्ट (NDPS Act) आणि आर्म ॲक्ट तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासात आरोपींनी हा अंमली पदार्थ ठाणे भागात विक्रीसाठी आणल्याचे उघड झाले आहे. न्यायालयाने आरोपींची २ जून २०२६ पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली आहे. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार आणि पाहिजे असलेल्या इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित यादव करत आहेत.
सदर धडक कामगिरी ठाणे शहराचे गुन्हे शाखेचे पोलीस उप आयुक्त अमरसिंह जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत गुन्हे शाखा घटक-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, सपोनि अमित यादव, पोउपनि प्रकाश शिरसाठ यांच्यासह पोलीस अंमलदार अविनाश पाटील, संदीप महाडिक, नंदकुमार पाटील, धनंजय आहेर, मुकुंद आव्हाड, शशिकांत सावंत, महिला पोलीस हवालदार दिपाली जाधव, अमोल ढावरे, प्रशांत लवटे, मयूर लोखंडे आणि सागर सुरळकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here