कर्नाळ हद्दीतील गावठी दारूची हातभट्टी जेसीबीच्या साहाय्याने उद्ध्वस्त

गावठी दारू

सांगली (जिल्हा संपादक संजय तोडकर) | सांगली जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दारूबंदी मोहिमेतंर्गत एक मोठी कारवाई केली आहे. मिरज तालुक्यातील कर्नाळ गावच्या हद्दीत ओढ्यालगत सुरू असलेली गावठी दारूची हातभट्टी पोलिसांनी जेसीबीच्या साहाय्याने पूर्णपणे उद्ध्वस्त केली. या कारवाईत ७५० लिटर गावठी कच्च्या दारूचे रसायन आणि इतर साहित्य मिळून एकूण ३१,६५० रुपये किमतीचा मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला आहे.

सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी जिल्ह्यातील अवैध गावठी दारू उत्पादकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी पोलीस उप-निरीक्षक महादेव पोवार यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तैनात केले होते. हे पथक माधवनगर परिसरात पेट्रोलिंग करत असताना, पोलीस अंमलदार अभिजीत माळकर आणि विक्रम खोत यांना गोपनीय बातमीदाराकडून महत्त्वपूर्ण माहिती मिळाली.
माधवनगर ते कर्नाळ रस्त्यावरील कर्नाळ गावच्या हद्दीत, ‘एस.सी. सीडस अँड फूडस फॅक्टरी’च्या उत्तरेस ओढ्यालगत जमिनीखाली बॅरल पुरून गावठी हातभट्टीची दारू तयार केली जात असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. जमिनीतून काढले बॅरल्समाहिती मिळताच पोलिसांनी सिमेंट फॅक्टरी जवळ वाहने लावून ओढ्याच्या दिशेने पायी चालत धाड टाकली. पोलिसांची चाहूल लागताच तिथे उपस्थित असलेले दोन इसम घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी परिसरात बारकाईने पाहणी केली असता, तिथे उग्र वास येत होता आणि जमिनीमध्ये थोड्या थोड्या अंतरावर लोखंडी बॅरल पुरलेले आढळून आले. सदरची गावठी हातभट्टी मानवी आरोग्यास अत्यंत घातक आणि अपायकारक असल्याने, पोलिसांनी आवश्यकतेनुसार सॅम्पल (नमुना) काढून घेतले. त्यानंतर जेसीबी मशीनच्या साहाय्याने जमिनीतून सर्व बॅरल्स बाहेर काढून, ७५० लिटर कच्चे रसायन आणि साहित्य जागीच नष्ट करून त्याचा चक्काचूर केला.

“जिल्ह्यात अवैध गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या आणि त्याची विक्री करणाऱ्यांवर यापुढेही अशीच विशेष मोहीम राबवून अत्यंत कठोर कारवाई करण्यात येईल.”
— संजीव झाडे
(पोलीस निरीक्षक, एलसीबी, सांगली)

या कारवाईत २६,२५०/- रुपये किमतीचे ७५० लिटर कच्चे रसायन (२०० लि. क्षमतेचे ५ लोखंडी बॅरल), ४,०००/- रुपये किमतीचे एकूण ८ रिकामे लोखंडी बॅरल, ४००/- रुपये किमतीचे १० लोखंडी डबे, ५००/- रुपये किमतीची १ लोखंडी कायल, ५००/- रुपये किमतीची २ कोळशाची पोती असा एकूण ३१,६५०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त आणि नष्ट करण्यात आला.
तपासादरम्यान सदर अवैध हातभट्टी नितेश कुंभार मारवाडी आणि संजय कुंभार मारवाडी (दोघे रा. कंझारभाट वस्ती, कर्नाळ, ता. मिरज, जि. सांगली) यांच्या मालकीची असल्याचे निष्पन्न झाले आहे. हे दोन्ही आरोपी सध्या फरार असून, त्यांच्याविरुद्ध सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात ‘महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९’ च्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कामगिरी एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे आणि सांगली ग्रामीणचे पोलीस निरीक्षक भैरू तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि महादेव पोवार, तसेच पोलीस अंमलदार अनिल कोळेकर, अतुल माने, महादेव नागणे, संदीप पाटील, विक्रम खोत, अभिजीत माळकर, संकेत कानडे, ऋषिकेश सदामते आणि श्रीधर बागडी यांच्या पथकाने केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here