शिरपूर शहर पोलिसांची धडक कारवाई: आश्रमशाळेचे पिकअप वाहन चोरणारे दोन तरुण जेरबंद, १.४० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

शिरपूर शहर पोलिसां

शिरपूर (प्रतिनिधी पवन मराठे) | तालुक्यातील जळोद येथील आश्रमशाळेच्या आवारातून धान्याची वाहतूक करणारे पिकअप वाहन चोरणाऱ्या दोन सराईत चोरांना शिरपूर शहर पोलिसांनी २४ तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून १ लाख ४० हजार रुपये किमतीचे ‘छोटा हत्ती’ वाहन हस्तगत करण्यात आले असून, पोलिसांनी चोरीचा हा गुन्हा उघडकीस आणला आहे.

२४ मे २०२६ रोजी दुपारी २.०० ते ३.२६ वाजेच्या सुमारास जळोद (ता. शिरपूर, जि. धुळे) येथील आश्रमशाळेच्या आवारातून शाळेचे धान्य आणण्यासाठी वापरले जाणारे पिकअप छोटा हत्ती वाहन (क्र. MH-15/CK-4882) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते. याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये वाहन चोरीचा गुन्हा (गु.र.नं. २३४/२०२६) दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे शोध पथक करत असताना, प्रभारी अधिकारी तथा पोलीस निरीक्षक श्री. किशोरकुमार परदेशी यांना गोपनीय माहिती मिळाली. जुने भामपूर येथील दोन तरुणांनी हे वाहन चोरल्याचे तपासात समोर आले.
पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकाने घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे जुने भामपूर येथून संगम गंगाराम सोनवणे (भिल) – वय २२ वर्षे, रा. चित्तेगाव, ता. चाळीसगाव, जि. जळगाव (सध्या रा. जुने भामपूर, ता. शिरपूर, जि. धुळे), अनिल खेमराज भिल (भवरे) – वय २२ वर्षे, रा. जुने भामपूर, ता. शिरपूर, जि. धुळे. या दोन संशयितांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी दोन्ही आरोपींची सखोल चौकशी केली असता, त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच चोरी केलेले पिकअप वाहन विखरण गावाजवळ एका पत्र्याच्या शेडमध्ये लपवून ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी छापा टाकून १,४०,०००/- रुपये किमतीचे पिकअप वाहन जप्त केले आहे.
सदर उल्लेखनीय कामगिरी धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (शिरपूर) श्री. विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोनिरी. किशोरकुमार परदेशी, तात्पुरता प्रभार असलेले पोनिरी. जयपाल हिरे, तसेच पोलीस अंमलदार रवींद्र अखडमल, अतुल पाटील, योगेश दाभाडे, मनोज दाभाडे, सोमा ठाकरे, आरीफ तडवी, सचिन वाघ, विनोद अखडमल, गोविंद कोळी, मनोज महाजन, भटू साळुंके आणि प्रशांत पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here