श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीच्या चेअरमनपदी विठ्ठलराव पवार यांची आदर्श वाटचाल

श्री साई संस्थान

नगर (प्रतिनिधी) | बालपणीच वडिलांचे छत्र हरपल्यानंतर आईच्या सात्त्विक संस्कारांत आणि शेतीच्या मातीत घडलेल्या एका ध्येयवेड्या तरुणाने आज शिर्डीच्या सहकार क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवला आहे. एक सामान्य शेतकरी, निस्सीम साईभक्त आणि प्रामाणिक संस्थान कर्मचारी ते थेट १५० कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या ‘श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी’चे चेअरमन होण्यापर्यंतचा विठ्ठलराव तुकाराम पवार यांचा प्रवास अत्यंत संघर्षमय आणि प्रेरणादायी आहे.

राहाता तालुक्यातील कनकुरी येथील तुकाराम व मिराबाई या शेतकरी दाम्पत्याच्या पोटी विठ्ठलरावांचा जन्म झाला. ते अवघ्या महिन्याचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. आई मिराबाई यांनी अत्यंत कष्टाने काळ्या आईची सेवा करत विठ्ठलरावांना वाढवले व शिकवले. बी.ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर विठ्ठलराव श्री साईबाबा संस्थानमध्ये कर्मचारी म्हणून सेवा बजावू लागले. “बाबांच्या दरबारात काम करताना साईभक्तांची सेवा घडते, हेच सर्वात मोठे पुण्य आहे,” या भावनेने त्यांनी व्यवस्थापनाने दिलेली प्रत्येक जबाबदारी चोख पार पाडली.
कोरोना काळात मंदिर बंद असतानाही संस्थानचे कर्मचारी ‘कोविड योद्धा’ म्हणून सेवा देत होते. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच संस्थानच्या कर्मचाऱ्यांनाही ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळावे, यासाठी विठ्ठलरावांनी जोरदार संघर्ष केला. कामगार हिताची मागणी केल्यामुळे व्यवस्थापनाने त्यांच्यावर अन्याय करत त्यांची बदली थेट स्वच्छता विभागात केली.
हा अन्याय पाहून कर्मचाऱ्यांनी त्यांना एम्प्लॉईज सोसायटीची निवडणूक लढवण्याचा आग्रह केला. विठ्ठलरावांना रोखण्यासाठी विरोधकांनी संचालक संख्या ११ वरून १७ केली. मात्र, कामगारांची भक्कम साथ आणि साईबाबांच्या आशीर्वादाने विठ्ठलराव यांच्या पॅनेलने सर्वच्या सर्व १७ जागा जिंकत १७-० असा ऐतिहासिक विजय मिळवला आणि विठ्ठलराव पवार चेअरमन झाले.

उच्चशिक्षित पत्नीची शेतीत साथ
चेअरमन असूनही विठ्ठलरावांनी स्वतःमधील शेतकरी जिवंत ठेवला आहे. त्यांच्या पत्नी उच्चशिक्षित (डी.एड., एम.एड.) असूनही त्यांना शेतीकामात पूर्ण मदत करतात. भाजीपाल्यासोबतच आंबा, लिंबू, सप्तरंगी अशी प्रयोगशील शेती हे दाम्पत्य करत आहे.
“आईने आयुष्यात घडवलेले संस्कार आणि साईबाबांचा ‘श्रद्धा-सबुरी’चा मंत्र यांच्या बळावरच मी हा अशक्य वाटणारा प्रवास करू शकलो. काळ्या आईची आणि साईभक्तांची सेवा करणे हाच माझ्या आयुष्याचा मुख्य उद्देश आहे.”
— विठ्ठलराव पवार (चेअरमन)

चेअरमनपदाची सूत्रे हातात घेताच विठ्ठलरावांनी निवडणुकीतील विरोध विसरून सर्वांना सोबत घेत पारदर्शक कारभाराला सुरुवात केली. गेल्या दोन वर्षांत त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले: संस्थेच्या सभासदांसाठी १० लाख रुपयांचा नैसर्गिक विमा उतरवला, ज्याचा लाभ १७ सभासदांच्या कुटुंबीयांना झाला., संस्थेच्या कायम कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ करत ३३ नवीन कर्मचाऱ्यांना कायम केले. लग्न व इतर कार्यात मिळणारी मदत ५ हजारांवरून ११ हजार रुपये केली. तसेच कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युईटीचे तीन वर्षांपासून थकलेले ४७ लाख रुपये संस्थेच्या नफ्यातून भरले. संस्थेला पहिल्या वर्षी ५ कोटी तर दुसऱ्या वर्षी साडेचार कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला. संस्था संपूर्णपणे स्वभांडवलावर चालत असून जिल्हा बँकेची सी.सी. मंजूर असतानाही एक रुपयाचेही कर्ज घेतलेले नाही. साई संस्थान कॅम्पसमध्ये १३ प्रसाद साहित्य विक्री स्टॉल चालवले जातात, जिथे चांदीचा गणपती प्रसाद, पाण्याच्या बाटल्या आणि कापडी पिशव्या माफक दरात मिळतात.
जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी वाटचाल सुरू असल्याचे विठ्ठलराव पवार यांनी सांगितले. संस्थेचे संस्थापक मधुकर पुरवंतकर व प्रथम अध्यक्ष स्व. बळीराम व्याजी कोते यांच्या स्मृतींना उजाळा देत संस्थेत त्यांच्या प्रतिमेचे अनावरणही करण्यात आले आहे. भविष्यात संस्थेचे स्वमालकीचे भव्य कार्यालय आणि स्वतःचा ‘प्रसाद कारखाना’ उभारण्याचा पवार यांचा मानस आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here