शिर्डी (प्रतिनिधी) | दैनिक पुण्यनगरी परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेला प्रतिष्ठित ‘हिरोज ऑफ अहिल्यानगर २०२६’ पुरस्कार सोहळा रविवारी सायंकाळी शिर्डी येथील हॉटेल सेंट लॉन येथे अतिशय दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा यामध्ये गौरव करण्यात आला. या सोहळ्यात श्री साईबाबा एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन श्री. विठ्ठलराव पवार यांना राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कृष्णप्रकाश आणि ‘बीजमाता’ पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या शुभहस्ते मानाचा ‘हिरोज ऑफ अहिल्यानगर २०२६’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा अत्यंत मानाचा पुरस्कार प्राप्त करून शिर्डीत परतल्यानंतर, श्री. विठ्ठलराव पवार यांच्या निवासस्थानी त्यांच्या या यशाचे कौतुक करण्यासाठी एका विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिर्डी विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन आप्पासाहेब तुकाराम कोते आणि ज्येष्ठ पत्रकार संजय महाजन आदी मान्यवरांच्या हस्ते विठ्ठलराव पवार यांचा शाल, श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
विठ्ठलराव पवार यांना मिळालेला हा सन्मान म्हणजे त्यांच्या अथक परिश्रमाची आणि प्रामाणिकपणाची पोचपावती मानली जात आहे. श्री साईबाबा संस्थानामध्ये अत्यंत तळागाळात, म्हणजेच ‘स्वच्छता विभागात’ काम करणाऱ्या एका साधारण कर्मचाऱ्यापासून त्यांनी आपल्या प्रवासाची सुरुवात केली होती. तिथून त्यांनी आपल्या कष्टाच्या आणि कामगार हिताच्या बळावर थेट संपूर्ण राज्यात नावलौकिक असलेल्या आणि वार्षिक कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या ‘श्री साईबाबा एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी’च्या चेअरमनपदापर्यंत झेप घेतली. त्यांचा हा इथपर्यंतचा संघर्षमय प्रवास थक्क करणारा आणि समाजासाठी एक मोठा आदर्श आहे.
केवळ संस्थेची प्रगती करण्यावरच न थांबता, विठ्ठलराव पवार यांनी धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. कामगार वर्ग आणि शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी त्यांनी कायमच पुढाकार घेतला. त्यांच्या याच सामाजिक कार्याची आणि तळमळीची विशेष दखल घेत आयोजकांनी त्यांना या मानाच्या पुरस्कारासाठी निवडले.
या भव्य पुरस्कार सोहळ्याला आणि सत्कार समारंभाला विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, स्थानिक नागरिक आणि साई संस्थानाचे असंख्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. “समाजासाठी झटणाऱ्या आणि स्वकर्तृत्वावर पुढे आलेल्या विठ्ठलराव पवार यांच्यासारख्या व्यक्तींचा गौरव होणे ही काळाची गरज आहे,” अशा भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या.







