पंढरपूर (प्रतिनिधी प्रकाश इंगोले) | महावितरण कंपनीने ग्राहकांच्या संमतीशिवाय जुने मीटर बदलून नवीन स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम सुरू केली आहे. मात्र, या नवीन स्मार्ट मीटरमुळे सर्वसामान्य ग्राहकांना भरमसाठ आणि वाढीव बिलांचा आर्थिक फटका बसत असल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने पंढरपूर महावितरण कार्यालयावर धडक देण्यात आली.
शिवसेना पंढरपूर विभाग प्रमुख दिलीप गणपतराव यादव यांनी आज पंढरपूरचे कार्यकारी अभियंता यांना या संदर्भात एक लेखी निवेदन सादर केले. या निवेदनात प्रशासनाला स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की, “ज्या ज्या भागात किंवा घरांमध्ये हे नवीन स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत, ते मीटर येत्या ५ जुलैपूर्वी तातडीने काढून त्या जागी पूर्वीचेच जुने मीटर पुन्हा बसवण्यात यावेत.” ही मागणी वेळेत पूर्ण न झाल्यास आगामी १० जुलै रोजी महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर तीव्र उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिलीप यादव यांनी दिला आहे. यावेळी महावितरणने ग्राहकांची लूट थांबवावी, अशी मागणीही शिवसैनिकांनी केली.
निवेदन देताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अनेक प्रमुख पदाधिकारी काकासाहेब बुराडे (उपजिल्हाप्रमुख), बंडूदादा घोडके (तालुकाप्रमुख), युवराज गोमेवाडीकर (शहरप्रमुख), गजानन टल्लू (उपशहरप्रमुख), प्रणीत पवार, अमोलभैय्या पवार, किरण सुरवसे, दत्तात्रय पाटील, नवनाथ चव्हाण, शेखर धोत्रे, बापू कदम आदींसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.







