जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर शरद चव्हाण) | येथील रावसाहेब रुपचंद विद्यालयात शनिवार, दि. २४ ऑक्टोबर २०२६ रोजी एकदिवसीय आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना आपत्तीच्या प्रसंगी घ्यावयाची काळजी, सुरक्षिततेचे उपाय आणि आपत्ती व्यवस्थापनाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक गिरीश रमणलाल भावसार सर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून स्काऊट-गाईडचे जिल्हा संघटक मा. अर्पित कडू उपस्थित होते. यावेळी स्काऊट कार्यालयातील वरिष्ठ पदाधिकारी जगदीश सोनवणे सर, विद्यालयातील ज्येष्ठ स्काऊट शिक्षक डी. बी. पांढरे सर , तुळशीराम पांढरे सर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रतिमापूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. स्काऊट-गाईडची प्रार्थना सादर करण्यात आली, तर श्री. डी. बी. पांढरे सर यांनी रामधून म्हटली.
यानंतर उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपत्तीच्या काळात कोणती खबरदारी घ्यावी, स्वतःची व इतरांची सुरक्षितता कशी जपावी आणि आपत्कालीन परिस्थितीचा सामना कसा करावा, याबाबत प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यात आली. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाविषयी उपयुक्त माहिती मिळाली.
या कार्यक्रमाला विद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, सर्व शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. डी. डी. जोशी सर यांनी केले, तर आभारप्रदर्शन गाईड शिक्षिका सौ. एस. एन. कोळी मॅडम यांनी केले.







