महाराष्ट्रात पुन्हा कडक लॉकडाऊन?; मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे नंदुरबार येथे वक्तव्य

udhav-thakre

नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – राज्यात करोना संसर्गाचा पुन्हा उद्रेक झाला आहे. गुरुवारी २५ हजार ८३३ रुग्णसंख्येसह आतापर्यंतचा उच्चांक नोंदवला गेल्याने आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन हादरलं आहे. त्यासोबतच सरकारी पातळीवर कोविड नियमावली अधिक कठोर करण्यासाठी पावले टाकली जाऊ लागली आहेत. त्यामुळे राज्यभरात पुन्हा कडक लॉकडाऊन लावले जाणार का, हा कळीचा प्रश्न उपस्थित झाला असून यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महत्त्वाचे विधान केले आहे.

धडगाव येथे आयोजित जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी, कृषि मंत्री दादाजी भुसे, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, जि.प.अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, आमदार मंजुळा गावित,विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज नंदुरबारमधील मोलगी येथील पोषण पुनर्वसन केंद्र तसेच ग्रामीण रुग्णालयातील लसीकरण केंद्राला भेट दिली. तिथे आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी वाढती करोना रुग्णसंख्या पाहता राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावले जाणार का, असे विचारले असताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.
‘राज्यात करोनाचा धोका पुन्हा वाढला आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यात जो सर्वोच्च बिंदू रुग्णसंख्येने गाठला होता तो ओलांडला गेला आहे. ही चिंतेची बाब आहे. अशा स्थितीत लॉकडाऊन करणं हा एक पर्याय समोर दिसत आहे पण लगेचच ते करणार नाही. लोक मास्क वापरू लागले आहेत ही चांगली गोष्ट आहे पण मला अजूनही लोकांकडून सहकार्य हवं आहे. लॉकडाऊन टाळायचा असेल तर स्वयंशिस्त ही पाळावीच लागणार आहे’, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी सूचना वजा इशारा दिला.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीतही उद्धव ठाकरे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. महाराष्ट्र किंवा देशाच्या पश्चिमेकडील राज्यांत अचानक झालेली मोठी रुग्णवाढ संभ्रमात टाकणारी असून याविषयी तज्ञ, संशोधक यांनी प्रकाश टाकावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे केली होती. विषाणूचे हे कुठले म्युटेशन किंवा आणखी काही प्रकार आहे का याविषयी मार्गदर्शन व्हावे असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले होते.

गेल्यावर्षी जेव्हा करोनाची साथ आली होती तेव्हा आपल्याकडे व्हॅक्सिन नव्हते. आता आपल्या हातात व्हॅक्सिन आहे. त्यामुळेच लसीकरणावर आमचा भर असून प्रत्येकाने न घाबरता लस घेतली पाहिजे. लसीकरणाला प्रतिसाद वाढला पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी केले. लस घेतल्यानंतरही करोनाची लागण झाल्याच्या अगदी मोजक्या केसेस आहेत. मात्र, त्यातून कुणी दगावण्याचा प्रकार घडलेला नाही. त्यामुळेच लस पूर्णपणे सुरक्षित आहे व ती सर्वांनी घ्यावी, अशी माझी विनंती असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here